
विज्ञान प्रेमींची उत्सुकता शिगेला : सलग चार दिवस पाहता येणार विविध घटना
निपाणी (वार्ता) : सरत्या वर्षातील शेवटच्या महिन्यात भोवतालच्या निसर्गासोबत आकाशातही विविध खगोलीय घटनांचा नवा बहर अनुभवण्यासाठी मिळणार आहे. वर्षातील शेवटच्या डिसेंबर या महिन्यात मंगळवार (ता.२) ते शुक्रवार अखेर (ता.५) “सुपर मून” बघण्याची संधी खगोल प्रेमींना उपलब्ध झाली आहे. त्यासोबतच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन सुद्धा बघता येईल. सलग चार दिवस या घटनांचा अनुभव विज्ञान प्रेमीसह खगोल प्रेमींना घेता येणार आहे.
सध्या स्थितीत सूर्य वृश्चिक राशीतील लाल रंगाच्या ज्येष्ठा नक्षत्रात तर रात्रीच्या प्रारंभी पूर्व आकाशात वृषभ राशीतील ठळक तारका रोहिणी दिसेल. याचवेळी आकाश मध्याशी मीन राशीतील शनी ग्रह पाहता येणार आहे. रात्री साडेआठच्या सुमारास पूर्व आकाशात मृग नक्षत्र आणि एका तासांनी मिथुन राशीतील गुरु ग्रह व पहाटे गुलाबी थंडीत पूर्वेस बुध आणि शूक्र पाहता येईल. त्यासोबतच सोळा देशांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेले संपूर्ण जगाती महाकाय आकाराचे अंतराळ संशोधन प्रयोगशाळा दर ताशी अठ्ठावीस हजार कि.मी. एवढ्या प्रचंड वेगाने केवळ दीड तासात एक पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करताना ज्या मार्गाने फिरते त्या भागातील लोकांना ते नुसत्या डोळ्यांनी पाहता येणार आहे. अशी ही फिरती चांदणी २ ते ५ डिसेंबर या सलग चार दिवसांत संध्याकाळी पाहता येईल.
मंगळवारी (ता.२) रात्री ७.९ ते ७.११ या दोन मिनिटात वायव्य आकाशातून चंद्राकडे जाताना चांदणी मध्येच विलूप्त होईल. बुधवारी (ता.३) संध्याकाळी ६.२२ ते ६ .२९ उत्तरेकडून पूर्वेकडे जाताना ६.२६ ला चंद्राजवळ दिसेल. गुरुवारी (ता.४) ७.११ ते ७.१६ या वेळेत पश्चिमेकडून दक्षिणेकडे जाईल. शुक्रवारी (ता.५) संध्याकाळी ६.२३ ते ६.२९ या वेळेत वायव्य आकाशातून दक्षिणेकडे जाताना ६.२८ वाजता शनी ग्रहाच्या खाली सुपर मून पाहायला मिळणार आहे.
——————————————————————
‘आकाशातील ही वैज्ञानिक घटना असून त्याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही. त्याबाबत नागरिकांनी अंधश्रद्धेपोटी गैरसमज पसरवू नये. अशा घडामोडींचा वैज्ञानिक अभ्यास करणे गरजेचे आहे.’
–एस. एस. चौगुले,
मुख्याध्यापक, विज्ञान शिक्षक, कुर्ली
Belgaum Varta Belgaum Varta