

मराठी भाषिकांची मागणी : निपाणीत आमदार क्षीरसागर यांच्याशी मराठी भाषिकांची चर्चा
निपाणी (वार्ता) : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून पुढील वर्षापासून यासंदर्भात सलग सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. याबाबत २१ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने उच्चाधिकार समितीची बैठक घेऊन मराठी भाषिकांच्या बाजूने निकाल लागेल याबाबत चर्चा करावी, अशी मागणी येथील मराठी भाषिकांनी कोल्हापूर उत्तरचे आमदार व महाराष्ट्र राज्य कार्यकारी नियोजन महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्याकडे केली.
आमदार क्षीरसागर यांनी बुधवारी (ता.४) निपाणीला भेट दिली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते नवनाथ चव्हाण यांनी आमदार क्षीरसागर यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी क्षीरसागर म्हणाले, सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारची भूमिका स्पष्ट असून ८६५ गावे महाराष्ट्रात सहभागी होईपर्यंत हा लढा कायम राहणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमाप्रश्नी तुरुंगवास भोगल्याने याचे गांभीर्य शिंदे यांच्यासह शिवसेनेला आहे. त्यामुळे उच्चाधिकार समितीची बैठक घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी दिले.
यावेळी श्री मराठा सौहार्द संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, दीपक वळिवडे, प्रा. भारत पाटील, सामाजिक कार्यकर्ते, नवनाथ चव्हाण, राहुल माने, शिवम सूर्यवंशी, दिग्विजय पुंडे, अशोक उर्फ बंडा दरी महाराष्ट्राचे कारण समितीचे पदाधिकारी, मराठी भाषिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta