
निपाणी तालुका पंचायत अधिकाऱ्याचा आदेश : तालुक्यात खळबळ
निपाणी (वार्ता) : ग्रामपंचायतीती सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन राजकारण विरहित कार्य केले तर गावाचा सर्वांगीण विकास होतो. मात्र मांगुर ग्रामपंचायत अध्यक्ष प्रदीप बिळगे यांनी मनमानी कारभार करत शासनाकडून मंजूर झालेल्या ३८ लाखांच्या कामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रद्दचे आदेश देण्यात आले. ऐन अधिवेशन काळातच कामांना स्थगिती दिल्याने तालुक्यात हा चर्चेचा विषय बनलेला आहे.
मांगुर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांनी येथील तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांनी दिलेले आदेश पत्र दाखवून याबाबत खुलासा केला. अध्यक्ष बिळगे हे जनतेची दिशाभूल करीत असल्याचे पुरावे आहेत. १४ नोव्हेंबर२०२५ ला १५व्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या कामांना मंजुरी मिळविण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलविले असल्याचे ते सांगत आहेत. पण ती ग्रामसभा नसून एन.आर.जी. उद्योगखात्री योजनेच्या माध्यमातून येणार्या कामांचा मंजुरीबाबत ग्रामसभा बोलण्यात आली होती.
विरोधी ग्रामपंचायत सदस्य कामांना अडथळा करत असल्याची अफवा पसरण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या प्रभागात विकास कामाचा आराखडा तयार करणे गरजेचे होते. पण तसे न करता इतर प्रभागात तपास करून त्यांनी स्वतःच्या प्रभागात निधीची तरतूद केली. त्यामुळे दुजाभाव झाला आहे.
याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन निवेदन सादर केले आहे. तरी सर्व प्रभागांना समान न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली आहे.
ग्रामविकास अधिकारी व तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी यांनी यासंदर्भातील सत्यता तपासून पाहिली असता वेगळाच प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. यामध्ये चुकीची माहिती देऊन हा संपूर्ण आराखडा बोगस तयार केलेला आहे तसेच या ३८ लाखांच्या निधीतून ७ लाख ५८ हजार रुपये हे परस्पर खर्च पडले असल्याचे निदर्शनास आले आहे.६ डिसेंबर २०२५ रोजी तालुका पंचायत अधिकाऱ्यांनी सदर प्लॅन रद्द करावा असा आदेश काढला आहे . या बाबतचा आदेश मांगुर ग्रामपंचायतीकडे पाठविला असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.
बैठकीस बाहुबली पाटील, देवदत्त राजहंस, राहुल प्रताप, संदीप पाटील, स्वप्निल माने, राजकुमार कुरडे, प्रदीप चौगुले, बबन पाटील, सागर बाचणे, साताप्पा टोपे, मंगेश भोरे यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta