

निपाणीत चोरट्यांचे सत्र सुरूच; शहरवासीय भीतीच्या छायेखाली
निपाणी(वार्ता) : गेल्या महिन्यापासून शहर आणि उपनगरात चोरीच्या घटनांनी उच्छाद मांडला आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. मात्र एकाही घटनेच्या तपास लागला नसताना पुन्हा शुक्रवारी (ता.१९) रात्री भीमनगर आणि उपनगरात येथे चोरट्यांनी दोन घरे फोडून साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम ४० हजार असा एकूण ४ लाखांचा मुद्देमाल व ऐवजाची चोरी केली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.
याबाबत घटनास्थळावर मिळालेली अधिक माहिती अशी, भीमनगर येथील रहिवासी निजाम सय्यद नगारजी हे शिवणकाम करतात. १५ दिवसांपूर्वी ते निपाणी येथून जवळच असलेल्या यमगर्णी येथील नातेवाईकाकडे कुटुंबीय समवेत दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या पत्नीवर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
निजाम नगारजी हे दोन दिवसापुर्वी आपल्या बांगड्याला कुलूप लावून बेळगाव येथे आपल्या मुलाकडे वास्तव्यास राहून पत्नीची देखभाल करीत होते. शनिवारी (ता.२१) सकाळी निजाम नगारजी यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरी घडवून आणल्याचे त्यांच्या भाडेकरूंच्या लक्षात आले. त्यानुसार त्याची माहिती निजाम नगारजी यांच्यासह नातेवाईक नगरसेवक सद्दाम नगारजी यांना देण्यात आली. त्यानुसार सद्दाम नगारजी व निजाम नगारजी यांनी घरात येऊन पाहणी केली असता चोरीचा प्रकार लक्षात आला.
यावेळी चोरट्यांनी तिजोरी तोडून दोन तोळ्याचा नेकलेस, एक तोळ्याची चेन, अर्ध्या तोळ्याची अंगठी तर रोख ३५ हजार रक्कम असा एकूण ४ लाख ऐवज व मुद्देमाल लांबवीत चोरट्यांनी घरातील साहित्य विस्कटून टाकल्याचे दिसून आले. घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, हवलदार सुदर्शन अस्की यांनी भेट घेऊन पंचनामा केला. केली. चोरट्यांनी भीमनगर तिसरी गल्ली येथील रहिवासी संतोष दिनकर जाधव यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून आतमधील तिजोरी फोडून ऐवज आणि रोखडची पाहणी केली. मात्र चोरट्यांना जाधव यांच्या घरातून कोणताही ऐवज व मिळाला नाही. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्यात येत होती.



Belgaum Varta Belgaum Varta