
डॉ. राहुल गिरी; निपाणीत फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन
निपाणी (वार्ता) : महापुरुषांनी जगाला तारणारे विचार दिले आहेत. त्यांची ऊर्जा नष्ट करण्यास अशक्य असून इतिहासही मिटविता येणार नाही. देशभक्तांनी आहुती देऊनच गुलामगिरीतून मुक्तता झाली आहे. याचे भान सर्वांनी ठेवण्याची गरज आहे. महापुरुषांनी जगाला तारणारे विचार दिल्याने समाजाला दिशा मिळाली आहे, असे मत युवा व्याख्याते व अभ्यासक डॉ. राहुल गिरी यांनी व्यक्त केले. डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे रविवारी (ता.२१) येथे आयोजित २९ व्या फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनात ते बोलत होते.
डॉ. कपिल राजहंस व मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योतीचे प्रज्वलन झाले. राजेंद्र वनडे यांनी स्वागत केले. प्रा. सुरेश कांबळे यांनी मंचच्या कार्याचा आढावा घेतला.
डॉ. गिरी म्हणाले, लोकशाहीच्या विकेंद्रीकरणासाठी डॉ.आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली. महापुरुषांनी अन्यायाविरुद्ध बंड केल्यानेच वर्ण व्यवस्थेतून समाज बाहेर पडला आहे. याची जाणीव प्रत्येकांनी ठेवली पाहिजे. अभिमानाला ठेच लागल्यानेच त्यांनी क्रांती केली आहे. त्याचे तरुणांनी भान ठेवून जीवनात वाटचाल करावी. लोकशाही नावापुरती न ठेवता ती जीवन पद्धती बनली पाहिजे. तरुणांनी महापुरुषांच्या जातीपेक्षा नाती समजून घेऊन प्रामाणिकपणे काम करत देश घडविण्याचे आवाहन डॉ.गिरी यांनी केले.

संमेलनास कोल्हापूर जिल्हा आरपीआय अध्यक्ष उत्तम कांबळे, सहकाररत्न उत्तम पाटील, प्रा. सुभाष जोशी, उद्योजक रोहन साळवे, सुप्रिया पाटील, राजेश कदम, राजेंद्र वडर, शंभो कल्लोळकर, राजू पोवार, राजू पाटील, मल्लेश चौगुले, प्रा. अच्युत माने, विजय मेत्राणी, अशोककुमार असोदे, नवनाथ चव्हाण, सभापती डॉ. जसराज गिरे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई -सरकार, सुनील शेवाळे, जे. डी. कांबळे, एन. डी. जत्राटकर यांच्यासह डॉ आंबेडकर विचार मंचचे कार्यकर्ते व निपाणी परिसरातील नागरिक उपस्थित होते. दीपक शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश मधाळे यांनी आभार मानले.


Belgaum Varta Belgaum Varta