
मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्र्यांची घेतली भेट
निपाणी (वार्ता) : निपाणी येथीलमहात्मा गांधी रुग्णालय अजूनही समुदाय आरोग्य केंद्र आहे. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेसह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्या दूर करण्यासाठी रुग्णालयास तालुका आरोग्य केंद्राचा दर्जा देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शहरवासीयांसाठी पट्टणकुडी माळात सुरू असलेला घरकुल निर्मिती प्रकल्प तात्काळ पूर्ण करावा. अक्कोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा पुरविण्यासह कुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करावे, यासह विविध मागण्या आरोग्य मंत्री दिनेश गुंडराव यांच्यासह विविध मंत्र्याकडे केपीसीसी सदस्य सुप्रिया पाटील यांनी केल्या.
अधिवेशन काळात सुप्रिया पाटील यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह विविध मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदने दिली. याशिवाय साखरवाडी येथील मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी निधी देण्याचीही मागणी केली.
अल्पसंख्यांक मंत्री जमीर अहमद यांच्याकडे येथील मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी उर्दू पदवीपूर्व महाविद्यालय मंजूर करून अंजुमन बोर्डसाठी अनुदान द्यावे. बेडकीहाळ कब्रस्तान, ईदगाह मैदानासाठी अनुदान द्यावे. अक्कोळ मरगुबाई मंदिर, बेडकीहाळ अष्टविनायक मंदिर, मरगुबाई मंदिर, विठ्ठल बिरदेव मंदिर, कुर्ली गुरु राजगिरी देवस्थान, तवंदी थळोबा मंदिरासाठी निधी द्यावा. अकोळ येथे ७ लाख लिटर क्षमतेचा मंजूर करावा. मांगुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी निधी द्यावा, अशी मागणी केली.
यासंदर्भात पाटील यांनी दिवंगत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी सदर कामांसाठी संबंधित मंत्र्यांकडे निवेदने दिली होती. पुन्हा एकदा वरील समस्या व कामे संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहेत. यापुढेही या कामांच्या मंजुरीसाठी माजी मंत्री वीरकुमार पाटील आणि बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करणार आहोत, असे सांगितले. यावेळी वायव्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनमण्णावर, माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, सुजय पाटील, टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकु पाटील, मंजीरी पाटील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta