कुर्ली हायस्कूलमध्ये विज्ञान सोहळा
निपाणी (वार्ता) : जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याची शक्ती विज्ञानात आहे. विज्ञानामुळे आपली जीवनशैली अधिक सुखकर झाली. दैनंदिन जीवनात असा एकही घटक नाही, ज्याला विज्ञानाने स्पर्श केला नाही. विज्ञानाने अशक्य वाटणार्या गोष्टी शक्य करून दाखविल्या आहेत. विज्ञान व जीवन या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून चालणारे मित्र आहेत. मानवी जीवनाला अधिक गतिमान, सुलभ करण्यासाठी व मानवी जीवनातील समस्या सोडविण्यासाठी विज्ञान खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असून त्याच्या आधुनिकतेचे मूळ हे विज्ञानच असल्याचे मत महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा सरोज पाटील (माई) यांनी व्यक्त केले. कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित आयोजित दिवंगत तुकाराम भाऊ साळुंखे आंतर शालेय विज्ञान प्रदर्शनप्रसंगी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेंजिंग कौन्सिल सदस्य डॉ. यशवंतराव तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विभागीय अधिकारी विनयकुमार हाणशी होते.
संजय शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी मिना तुकाराम साळुंखे व डी. बी. साळुंखे यांचा डॉ. यशवंतराव थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सरोज पाटील यांनी, अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्या गोष्टीपासून आलिप्त राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यानी आत्मविश्वासाने अभ्यास केल्यास यश मिळते असे सांगितले.
विनयकुमार हाणशी यांनी, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान प्रदर्शन आवश्यक असून प्रत्येक उपकरणाचे वैज्ञानिक तत्व अभ्यासणे गरजेचे असल्याचे संगितले. डॉ. यशवंतराव थोरात यांनी, विद्यार्थानी शालेय जीवनापासून दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीमागील विज्ञान समजून घेणे आवश्यक असून त्याचा वापर कृतीत केला पाहिजे असे संगितले.
एस. एस. चौगुले यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. सरोज पाटील यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाश, सीमा पाटील यांच्या हस्ते जैवविविधता फोटो प्रदर्शन, डी. बी. साळुंखे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद जीवन चरित्र फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांना मान्यवराच्या नागरिकांनी भरभरून दाद दिली.
याप्रसंगी तानाजी पाटील, अरुण निकाडे, के. डी. पाटील, सुभाष निकाडे, विश्वनाथ पाटील, सीताराम चौगुले, कुमार माळी, सिदगोंडा शेडबाळे, डी. एस. चौगुले, सुर्याजी पोटले, विठ्ठल मागदुम, शिवाजी चौगुले, नाना पाटील, राजेंद्र चौगुले, के. आर. वाळवे यांच्यासह विद्यालयाचे आजी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. तर बी. एस. पाटील यांनी आभार मानले.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …