
सहकाररत्न उत्तम पाटील; बोरगावमध्ये कुपलिका खुदाईचा प्रारंभ
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहराला दरवर्षी उन्हाळ्यात किमान दोन महिने बोरगाव येथील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते. तरीही पट्टण पंचायतीच्या माध्यमातून त्यावर मात करून पाणीपुरवठा केला जात होता. पण भविष्यातील पाण्याची टंचाई लक्षात घेऊन शहरात सर्वच प्रभागात उन्हाळ्यातही मुबलक पाणीपुरवठा होईल, या पद्धतीने प्रत्येक प्रभागात कुपनलिकांची खुदाई केली जात आहे. याशिवाय विद्युत कनेक्शन, जलकुंभ, विद्युत मोटार यांची व्यवस्था ही केली जात आहे. त्यामुळे शहरवासीयांना भविष्यात मुबलक पाणी मिळणार असल्याचे सहकाररत्न उत्तम पाटील यांनी सांगितले. बोरगाव येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये आयोजित कुपनलिका खुदाई प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.
पट्टण पंचायत अध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या हस्ते कुपनलिका खोदाईचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, सदस्या शोभा हावले व महिलांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
पट्टण पंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून या कुपनलिकेसाठी चार लाखाचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून या प्रभागात पाणीपुरवठा योजना राबविली जात आहे. भविष्यात सर्वच प्रभागात कुपनलिका खुदाई करून समान पद्धतीने पाणीपुरवठा होणार असल्याचे नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी सांगितले.
कार्यक्रमास सभापती प्रदीप माळी, तुळशीदास वसवाडे, दिगंबर कांबळे, नगरसेविका रुक्साना अफराज, वर्षा मनगुत्ते, राजू मगदूम, मनोज पाटील, संगीता शिंगे, अमर शिंगे, जयश्री कुरळे, आरती कुरळे, शशिकांत कांबळे, भूषण मधाळे, मंगल गजरे, सागर मधाळे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta