
टाऊन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकू पाटील यांची माहिती
निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरातील दूध उत्पादक शेतकरी व ग्राहकांच्या पाठबळावर सन २०११ साली सचिन काटकर, बाळासाहेब पोवार, परशराम लोकरे यांनी सुरु केलेल्या कृषीधन दुध उत्पादक सहकारी संघाचा १४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भव्य जनरल बैलगाडी शर्यतीसह विविध शर्यतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निपाणी टाऊन प्लॅनिंग समितीचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांनी संस्थेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
याविषयी माहिती देताना निकू पाटील म्हणाले, गेल्या १४ वर्षांपासून संस्था सर्वांच्या सहकार्याने दूध उत्पादक, शेतकरी आणि ग्राहकांचे हित जोपासत सुरळीतपणे सुरू आहे. संस्थेने स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकीतून दरसाल वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम राबविले आहेत. त्यानिमित्ताने संस्थेला सर्वच क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी भेटी देऊन संस्थेचे कौतुक केले आहे. युवकांमध्ये मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी. अध्यात्मिक छंद जडावे यासाठी किर्तन, क्रिकेट, व्हॉलीबॉल, दहिहंडी यासरखे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. सचिन काटकर यांनी मांडलेल्या सूचनेनुसार वर्धापन दिनी शर्यतीचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार येत्या दि. १ जानेवारी २०२६ नववर्ष दिनी हालसिध्दनाथ मंदिर ते श्रीपेवाडी ते नांगनूर मळा (डांबरी पट्टा) येथे भव्य बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याकरिता प्रथम क्रमांकास होंडा युनिकॉर्न दुचाकी, द्वितीय क्रमांकास हिरो स्प्लेंडर प्लस, तृतीय क्रमांकास एच एफ डिलक्स् दुचाकी प्रदान करण्यात येणार आहे. याच बरोबरीने शर्यत शौकीनांच्या आग्रहाखातर जनरल घोडा-बैल शर्यत आयोजित केली आहे. त्याकरिता अनुक्रमे १५०००/-, १००००/-, ७०००/- बक्षिसे देण्यात येणार आहेत. जनरल घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे १००००/-, ७०००/-, ५०००/- रुपयांची पारितोषिके देण्यात येतील. तर, आदत घोडा, बैल शर्यतीसाठी अनुक्रमे ७०००/-, ५०००/-, ३०००/-रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी यामध्ये सहभागी होण्याकरिता डॉ. सचिन काटकर (९९००३११६९०), तात्यासो वालीकर (९००८१९४७९२), प्रदीप इंगवले (९३४२४४४९०८), स्वप्निल पावले (९५३८५७१०५७) यांच्याशी संपर्क साधावा. सर्व शर्यत शौकीनांनी या शर्यतीचा लाभ घ्यावा. शर्यत यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही निकू पाटील यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार, उपाध्यक्ष डॉ. सचिन काटकर, परशराम लोकरे , तात्यासाहेब वालीकर, मलगोंडा गिरगावे, रणजित मगदूम, शैलेश मल्लाडे, विक्रांत पावले, सतीश शिंदे, महादू मल्लाडे, राजू पाटील, रमेश भोईटे, नितीन उपाळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta