
बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, आयुक्तांची भेट; नागरिकांतून समाधान
निपाणी (वार्ता) : काँग्रेस सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने निपाणी येथे इंदिरा कॅन्टीन मंजूर करून सर्वसामान्यांना अल्प दरात नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी निधी मंजूर आहे. पण संबंधित कंत्राटदारांनी इंदिरा कॅन्टीन इमारतीचा पायाच डळमळीत केल्याने बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी आक्षेप घेतला होता. सतत पाठपुरावा करून त्यांनी निकृष्ट दर्जाचा पाया असल्याचे दाखवून दिले होते. अखेर नगरपालिका आयुक्त गणपती पाटील व चिंगळे यांनी संबंधित कंत्राटदाराला धारेवर धरून निकृष्ट दर्जाचा पाया काढून चांगल्या पद्धतीने पाया घालण्याची सूचना वजा इशारा दिला आहे. त्यामुळे भविष्यात इमारतीचे बांधकाम चांगले होणार असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
वेगवेगळ्या कारणांनी शहरात इंदिरा कॅन्टीनला विरोध होत असताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी, लक्ष्मणराव चिंगळे यांच्या पुढाकाराने निपाणीत बस स्थानकाच्या आवारात इंदिरा कॅन्टीन उभारणीचे काम सुरू झाले होते. पण कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे इमारतीचे काम निकृष्ट होत होते. याबाबत लक्ष्मण चिंगळे यांनी निरंतरपणे कॅन्टीन स्थळी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. पण काम निकृष्ट होत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर संबंधित कंत्राटदाराची कान उभारणी केली होती. या काळात अनुपस्थित असलेले नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी मंगळवारी (ता.३०) घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. त्यामुळे लक्ष्मणराव चिंगळे यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे कॅन्टीनचे काम योग्य पद्धतीने होणार असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या.
यावेळी माजी नगरसेवक ॲड. संजय चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत, रामचंद्र निकम, फारुक पटेल, बाळासाहेब कमते, अशोक लाखे, प्रकाश पाटील, बाबासाहेब तिप्पे, उत्तम कामते, धनाजी क्षिरसागर, यासीन मनेर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta