रेवती मठद : विज्ञान प्रदर्शनात कागलची पूर्वा माणगावे प्रथम
निपाणी (वार्ता): प्रत्येक विद्यार्थ्यांकडे जन्मत: एखादी अभूतपूर्व कला असते. त्याला संधी देण्याचे काम शाळा करते. शालेय अभ्यासातील प्रयोगातून विज्ञानाची गोडी वाढते. पण विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला संधी मिळते. यासाठी प्रत्येक शाळांतून अशी प्रदर्शने भरविण्याची गरज असल्याचे मत, निपाणी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी व्यक्त केले. त्या रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित दिवंगत तुकाराम भाऊ साळुंखे आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील होते.
एस. एस. चौगुले यांनी प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाचे स्वरूप स्पष्ट केले. याप्रसंगी डी. डी. हाळवणकर, दिलीप शेवाळे, ए. पी. कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या वतीने रेवती मठद यांचा मीना साळुंखे यांच्या हस्ते, डॉ. भारत पाटील यांचा जैवविविधता फोटो प्रदर्शनाबद्दल सत्कार करण्यात आला. करनूर येथील संदीप पाटील व आप्पाचीवाडी येथील संदीप कुंभार यांनी ड्रोनची प्रात्यक्षिके दाखविले.
विज्ञान प्रदर्शनात पूर्वा प्रकाश माणगावे-सरलादेवी माने हायस्कूल कागल, स्नेहा राजाराम गंगाधरे-म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे, एमएचपीएस हलसिद्धनाथनगर सौंदलगा, वर्षा पाटील व ऐश्वर्या बुदीहाळे आदिती दत्तात्रय पाटील-सागर पाटील विद्यालय- ढवळी यांनी प्रथम ते पाचव्या क्रमांकाचे बक्षिसे मिळवली. तर समृद्धी हळीज्वाळे व संप्रिता चौगुले-कोगनोळी हायस्कूल कोगनोळी यांनी उत्तेजनार्थ बक्षीस पटकाविले.
स्पर्धेत महाराष्ट्र व कर्नाटकातील 29 हायस्कूलमधील 42 उपकरणे सहभागी झाली होती. बेळगाव येथील राणी चन्नमा युनिव्हर्सिटीचे प्रा. सौरभ वैराट, प्रा. समीना मुल्ला, सिद्दोजीराजे देसाई पी. यु कॉलेजमधील प्रा. प्रतिभा पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना गट शिक्षणाधिकारी रेवती मठद, मुख्याध्यापक बी. एस. पाटील, मीना साळुंखे यांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी एस. ए. पाटील, एस. एस. साळवी, यु. पी. पाटील, एस. जी. लिंबिगीडद, आर. आर. मोरे, विजय साळुंखे, नम्रता शिंत्रे यांनी परिश्रम घेतले. टी. एम. यादव यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta