उत्तम पाटील : माणकापूर मलकारसिद्ध यात्रा
निपाणी (वार्ता) : सध्याच्या युगात प्रत्येक जण भौतिक सुखाच्या मागे लागल्याने मनशांती मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येकाला कामातून वेळ कमी पडत असल्याने देवधर्म व्रतवैकल्यांचा विसर पडत चालला आहे. परिणामी मानवी जीवन दिवसेंदिवस गुंतागुंतीचे बनत चालले आहे. अशा परिस्थितीत मनःशांतीसाठी मठ मंदिरांची गरज आहे. आपण गेल्या पाच वर्षापासून मानकापूर मलकारसिद्ध यात्रेतील पालखी सोहळ्यात सहभागी होत आहोत. श्री मलकारसिद्ध व माणकापूर ग्रामस्थांचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी आहे. मंदिराच्या विकासकामांसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. माणकापूर येथील मलकारसिध्द यात्रा पार पडली. यावेळी आयोजित पालखी पूजन व मिरवणूक प्रसंगी ते बोलत होते.
पालखीचे पूजन उद्योगपती रणजीतदादा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. तर उद्घाटन धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले व युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री जोल्ले यांनी, मलकारसिद्धाच्या आशीर्वादाने आपण दोन वेळा आमदार व दोन वेळा मंत्री झालो आहोत. मागीलवेळी आपण मंदिरास ८ लाखाचा निधी दिला होता. तर धर्मादाय मंत्री झाल्यानंतर १० लाखांचा निधी मंदिरास उपलब्ध करून दिला आहे. मलकारसिद्ध मंदिर व ग्रामस्थांच्या विकासकामांसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा वैशाली कुंभार, उपाध्यक्ष सुनील म्हाकाळे, यात्रा कमिटी उपाध्यक्ष जयपाल चौगुले, मुकुंद कुलकर्णी, सुकुमार चौगुले, मल्लू हंडे, सुरेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य युनुस मुल्लाणी, राजू कुंभार, श्रीकांत लोंढे, कविता लोंढे, स्नेहल छत्रे, जयश्री पुजारी, राकेश चौगुले, प्रमोद शेवाळे, संदीप बन्ने, कार्याध्यक्ष अमोल करवते, मारुती बन्ने, बाबू कुंभार, प्रविण गायकवाड, अरिहंत तेरदाळे, सागर चौगुले, रावसाहेब बत्ते, प्रकाश पाटील यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य, यात्रा कमिटी सदस्य व भाविक उपस्थित होते.