
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील प्रभाग क्रमांक २८ मधील स्वामी मळ्यातील मराठी शाळा खोल्यांची दुरावस्था होऊन पावसाळ्यात गळती लागत होती. शिवाय या खोल्यांचा विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाला होता. याबाबतची माहिती प्रभागाच्या नगरसेविका शांती सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत यांनी खोल्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्यानुसार दुरुस्ती न करता खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या निधीतून नवीन २ शाळा खोल्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी ४० लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. त्या कामाचा प्रारंभ बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रारंभी माजी नगरसेविका शांती सावंत यांनी स्वागत करून सामाजिक कार्यकर्ते दीपक सावंत यांनी शाळा खोल्या बाबतची माहिती दिली.
लक्ष्मणराव चिंगळे यांनी, स्वामी मळ्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी हा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शाळेतील खोल्यांची समस्या निकालात निघणार आहे. खोल्यांचे बांधकाम दर्जेदार करण्याची सूचना संबंधित कंत्राटदारांना केल्याचे सांगितले.
यावेळी सुजय पाटील, गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक, दीपक सावंत, ॲड. संजय चव्हाण, रामचंद्र निकम, फारुख गवंडी, अरुण आवळेकर, विनोद बल्लारी, फारुख पटेल, बाळासाहेब कमते, समीर काझी, उत्तम कामते, रवींद्र श्रीखंडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदीप सातवेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta