
पंचहमी योजना पदाधिकारी आक्रमक आठवड्याभरात समस्या सोडविण्याच्या सूचना
निपाणी (वार्ता) : प्रवाशांची वाढती संख्या आणि सुविधांचा अभाव असल्याने दहा वर्षापूर्वी येथे कोट्यावधी रुपये खर्च करून ‘हायटेक’ बसस्थानक निर्माण करण्यात आले आहे. केवळ तीनच वर्षात या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. आगाराच्या परिसरात अनेक लहान मोठे खड्डे, परिसरात कचऱ्याचे ढीग, तुंबलेल्या गटारी, दुर्गंधीत वातावरण गेल्या सात वर्षापासून सुरू आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन तालुका गॅरंटी योजना पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी आगारात भेट देऊन आगारप्रमुखांना चांगलेच झाल्यावर धरले. आठवड्याभरात आगारातील समस्या सोडविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
सलग सात वर्षे पावसाळ्यात खड्डे निर्माण होत आहेत. त्यातूनच प्रवासी आणि बसचु येजा सुरू आहे. याबाबत प्रवाशांनी बऱ्याचदा आगारप्रमुखाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दरवर्षी खड्ड्यांच्या आकारात वाढ होत आहे. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटी पद्धतीवर केवळ एकच महिला कार्यरत आहे. त्यामुळे आगाराचा परिसर कचऱ्याने व्यापून जात आहे. शिवाय गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.
लोटण्यात आलेला कचरा आगाराबाहेर नेण्यात येत नसून एका कोपऱ्यात तो जळला जात आहे. त्यामुळे प्लास्टिक धुराचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आगारात सोयी सुविधा देण्याऐवजी शिल्लक असलेल्या जागेमध्ये गाळे बांधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आगारातर्फे केला जात आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सर्वच प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था अत्यंत तोकडी पडत आहे. याबाबतही आगारप्रमुखांना सूचना करण्यात आले आहेत. आगार प्रमुख संगाप्पा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी गॅरंटी योजनेचे तालुका अध्यक्ष रमेश जाधव, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी प्रवीण कट्टी, सदस्य प्रतीक शहा, सचिन खोत, जितेंद्र चेंडके, प्रकाश पाटील, अशोक लाखे, यासीन मनेर यांच्यासह सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta