
जागतिक वन्य दिन विशेष
जनजागृतीसह शिकार थांबवणे गरजेचे
निपाणी (वार्ता) : जैवविविधतेच्या संवर्धनासाठी दरवर्षी ३ मार्चला जागतिक वन्यजीव दिन साजरा केला जातो. याचा उद्देश नष्ट होणाऱ्या प्रजातींविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवणे हा आहे. परंतु वाढते जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे अनेक दुर्मिळ प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात निसर्गाचा समतोल बिघडून त्याचा मानवी जीवनावर परिणाम होणार असल्याचे मत येथील पर्यावरण, पक्षप्रेमी नागरिक आणि सृष्टी पर्यावरणवादी संघटनेचे संस्थापक फिरोज चाऊस यांनी व्यक्त केले. जागतिक वन्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते.

चाऊस म्हणाले, पूर्वी मोठ्या संख्येने असलेले पक्षी वर्षानुवर्षे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोठ्या प्रमाणात केलेल्या शिकारीसह जंगलतोडीमुळे प्राणी आणि पक्ष्यांच्या प्रजाती संपुष्टात येत आहेत. डच बटरफ्लाय ही दुर्मिळ फुलपाखरांची प्रजाती सर्वच ठिकाणी पाहायला मिळत होती. पण वाढत्या शहरीकरणामुळे केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच प्रजाती सध्या आढळून येत आहेत. वन्यजीव आणि वनस्पतींचे संवर्धन, नष्ट होणाऱ्या प्रजातींबाबत जनजागृती करणे आणि शिकार थांबवणे यासाठी दरवर्षी वन्य दिन विशेष कार्यक्रम केला जातो. विविध कार्यक्रमांतून निसर्ग साखळीतील वन्यजीवांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. याशिवाय तस्करीला आळा घालणे आणि जैवविविधता टिकवून ठेवण्याबाबत जनजागृती केली जाते. पण वर्षभर याबाबत कोणतेच उपक्रम हाती घेतले जात नाहीत. हा दिवस केवळ नावापुरताच राहिला आहे.
अन्नसाखळी टिकवून ठेवण्यासाठी औषधे आणि मानवी अस्तित्वासाठी वन्यजीवांचे संरक्षण करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी वन्यप्राण्यांची अवैध शिकार आणि तस्करी थांबवणे. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे.. प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे. वन्यजीवांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज बनली आहे. वन्यजीव आणि वनस्पती ही पृथ्वीवरील महत्त्वाचे घटक आहेत. ते नष्ट झाल्यास जैवविविधतेचे संतुलन बिघडून निसर्गचक्र बाधित झाल्याशिवाय राहणार नाही. वाढते प्रदूषण, जंगलतोड, हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेपामुळे वनस्पती आणि प्राण्यांचे धोक्यात आल्याचे चाऊस यांनी सांगितले.
——————————————————————–

वन्यजीव, वनस्पती संवर्धनाची प्रत्येकाची जबाबदारी
वन्यजीव आणि वनस्पतींचे संवर्धन ही केवळ सरकारांची जबाबदारी नसून तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.
त्यासाठी नागरिकांनी जंगलतोड थांबवून वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. याशिवाय प्रत्येकाने एक रोप लावून त्याचे संगोपन केल्यास हरितक्रांती होऊ शकते. त्यामुळे प्राणी पक्षांचा आदिवासही वाढू शकतो. आतापर्यंत आपल्या कुटुंबातर्फे रिकाम्या जागेसह स्मशान शेडमध्येही पाच हजार पेक्षा अधिक रोपे लावून ती जगवली आहेत. याशिवाय पक्षी आणि प्राण्यांच्या शिकारीविरोधात कठोर नियम लागू करावी. प्रदूषणाबाबत खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
जैवविविधतेच्या संवर्धनासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केल्यास खऱ्या अर्थाने जागतिक वन्य दिन साजरा केल्यासारखे होईल.’
-नामदेव चौगुले,, पर्यावरणप्रेमी शिक्षक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta