
प्रा. मुकुंद कांबळे : शताब्दी महोत्सव कमिटीतर्फे अभिवादन
निपाणी (वार्ता) : भारत देशाची खरी ओळख त्याच्या विविधतेत आणि लोकशाही व्यवस्थेत आहे. या सर्वांचा पाया म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि संधी देणारे हे संविधान आजही आपल्या समाजाला योग्य दिशेने मार्गदर्शन करत आहे. संविधानाच्या निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाजातील सर्व घटकांचा विचार करून एक न्याय आणि समावेशक संविधान तयार केले. जे आजही आपल्या देशाचा मजबूत पाया आहे. आजच्या बदलत्या काळातही संविधानाचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट, प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणे अधिक गरजेचे झाले आहे. संविधान केवळ शासनाची चौकट नसून ते देशाची प्रगती आणि एकतेचे प्रतीक आहे, असे मत प्रा. मुकुंद कांबळे यांनी व्यक्त केले. येथे शताब्दी महोत्सव कमिटी तर्फे आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रथम पदस्पर्शास १०१ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अभिवादन सभेत प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अच्युत माने होते प्रारंभी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला उदय वंटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुशील कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली.
अमित शिंदे यांनी स्वागत तर संतोष मेस्त्री यांनी प्रस्ताविक केले. कांबळे म्हणाले, भारतीय संविधान हे केवळ कायद्यांचे पुस्तक नसून, ते भारताच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. त्याचे पालन करणे आणि त्याचा सन्मान राखणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. अच्युत माने म्हणाले, शताब्दी महोत्सव कमिटीने उत्तम कार्य केलेला आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची द्विशतक जयंती आणि महाड चा सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. हे दोन्ही कार्यक्रम येत्या वर्षभरामध्ये शताब्दी महोत्सव कमिटी मार्फत कमिटी मार्फत वर्षभर प्रबोधन करण्यात येणार असल्याचे सांगितले
शताब्दी महोत्सव कमिटी सुधाकर माने म्हणाले, निपाणी ही भूमी आंबेडकर चळवळीचे केंद्रबिंदू आहे. डॉ. आंबेडकरांच्या सर्वाधिक सभा निपाणीत झाल्या आहे. यासाठी ही भूमी पुण्यभूमी असल्याचे सांगितले. ॲड. महेंद्र मंकाळे यांनी उज्वल समाज निर्मिती करणे बाबासाहेबांचे स्वप्न होते. येणाऱ्या काळामध्ये चळवळ गतिमान करून बाबासाहेबांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास प्रा.अजित कांबळे, जनार्दन मोहिते, प्राध्यापक एन. डी. जत्राटकर, मंगलदास कांबळे गणू गोसावी एम. ए. नाईक, कबीर वराळे संजय शितोळे, शरद कांबळे, संजय कांबळे, नानासाहेब जामदार, बाबासाहेब कांबळे, रवींद्र घस्ते, कर्णकुमार कांबळे, यांच्यासह शताब्दी महोत्सव कमिटीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. सुशील कांबळे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta