एअर बॅग उघडल्यामुळे वाचले सांगलीच्या तिघांचे प्राण
निपाणी : पुढे जाणाऱ्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने जोराची धडक दिली. या अपघातात केवळ एअर बॅग उघडल्याने त्यातील सांगलीमधील प्रवासी बचावल्याची घटना शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी हद्दीतील बॉम्बे धाब्याजवळ हा अपघात झाला. त्यामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी, रोहित अक्कोळकर हे आपली कार (एमएच १६ सीव्ही ०९९३) घेऊन बंगळूर येथून अहमदनगरकडे जात होते. यमगर्णीजवळील बॉम्बे धाबानजीक कार आली असता अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. त्यानंतर ही कार दुभाजकावर जाऊन रस्त्याच्या विरुद्ध दिशेला गेली. याचवेळी समोरून सांगलीहून बेळगावकडे जाणाऱ्या (एमएच १०-सीक्यू १९००) कारने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की कार तीनवेळा पलटी होऊन महामार्गावर उलटली. यामध्ये कारचालक अमित दिलीप करमळकर (वय ४८), सुनील दिलीप करमळकर (वय २२) व अभिजित अशोक घोरपडे (वय ३३, सर्व रा. सांगली) हे जखमी झाले आहेत. कारमध्ये असलेल्या एअर बॅगमुळे तिघांचे प्राण वाचले आहेत. अपघातानंतर बघ्यांची गर्दी झाल्याने महामार्गावर काहीकाळ वाहतुकीची कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू केली. रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिस स्थानकात झालेली नव्हती.