सौंदलगा : सौंदलगा येथील राष्ट्रीय महामार्गावरील शिगावे मळ्या नजीक ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन अपघात झाला. त्यात १० ते १५ ऊसतोड मजूर जखमी झाले आहेत. चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने सोमवारी (ता.१४) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. ट्रॅक्टर चालक फरारी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, डालमिया येथील शुगर कारखाना येथून ऊस तोडण्याचे काम आवरून घरी आपल्या गावी परत असलेले ऊस तोड मजूर धुमडेवाडी (ता.चंदगड) येथील जोतिबा पाटील या मालकाचा ट्रॅक्टर एम एच.०९.एफ व्ही.०३२३ हा ट्रॅक्टर व एम एच. ०९.ई यू.४९७० ही ट्रॉली घेऊन त्यांच्याकडे निघाले होते. पण सौंदलगा येथे शिगावे मळा नजीक आले असताना चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन १० ते १५ ऊसतोड मजूर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच निपाणी पोलीस ठाण्याचे ए.एस.आय. व्ही. एन. पाटील, हवालदार गस्ते, शिवन्नावर, काँस्टेबल प्रभू सिद्धतीमठ यांनी भेट देऊन अपघातग्रस्त जखमींना निपाणी येथील महात्मा रुग्णालयात १०८ या रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले. जय हिंद रोड डेव्हलपर्सचे सुपरवायझर प्रकाश बामणे व त्यांच्या कर्मचार्यांनी तसेच नागरिकांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली व महामार्ग वाहनांच्यासाठी खुला केला.