सौंदलगा : कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदलगा येथील जागृत देवस्थान श्री रेणुका देवीची यात्रा रंगपंचमी दिवशी मंगळवारी (ता.२२) भरत असून गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे ही यात्रा होऊ शकली नव्हती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्यामुळे यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार आहे. यात्रा सोमवार (ता.२१) पासून सुरू होणार असून यात्रेचा मुख्य दिवस मंगळवार आहे. बुधवारी यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गेली दोन वर्षे कोरनामुळे यात्राच होऊ शकली नाही. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ग्रामस्थांनी यात्रेची तयारी ही अगोदर पासूनच केली आहे. यावर्षी पै-पाहुण्यासह, माहेरवाशिणीना यात्रेचे आमंत्रण पोहोचले आहे. सौंदलगा हे सीमावर्ती गाव असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी येतात. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे कौलव, कुर्डू, घोटवडे आदी ठिकाणाहून बैलगाड्याना सवारी जोडून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. यावर्षी सोमवारीच या बैलगाड्यांचे आगमन होणार आहे. या बरोबरच खेळणी, मिठाईवाले, नारळ विक्रेते, हॉटेल, आईसक्रीमचेगाडे येण्यास सुरुवात झाली आहे. यावर्षी मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे व श्री रेणुका देवीचा वार असल्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. या यात्रेचा मान पाटील (गलगले) या परिवाराकडे असून यात्रेचा मुख्य दिवशी मंगळवारी पहाटे दंडवताचा कार्यक्रम होत. असून पहाटेपासूनच दंडवत घालण्यास सुरुवात होते. दंडवत झाल्यानंतर लिंब नेसण्याचा कार्यक्रम होतो. यावेळी बैलगाडीतून आलेले भाविक आपल्या बैलांना ही लिंब नेसवतात त्याबरोबरच सकाळी श्री रेणुकादेवीस महाअभिषेक घालून महापूजा केली जाते. या पूजेचा मान पाटील (गलगले) यांच्याकडे आहे. दुपारी १२ वाजता रेणुका मंदिरातील कोतवालास सबिना घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा काढली जाते. त्यानंतर आरती होते. नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर भक्त मंडळाकडून रात्री देवीच्या गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या यात्रेसाठी निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त ठेवला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत यात्रेकरूंना आरोग्य सेवा दिली जाणार आहे. त्याबरोबरच ग्रामपंचायतीकडूननही यात्रेची तयारी केली आहे. या यात्रेसाठी भाविक भक्तांनी कोवीडचे नियम पाळावेत, असे यात्रा कमिटी व पाटील (गलगले) परिवाराकडून कळविण्यात आले आहे.
