निपाणी (वार्ता) : जत्राटवेस मधील प्रभाग १४ हा भाग अजूनही अनेक सुविधा पासून वंचितच आहे. येथील रस्ते, गटारींची दुरवस्था झाली असून अस्वच्छता व घाणीचे वातावरण तयार झाले आहे. अजूनही काही ठीकाणी पथदीपाची व्यवस्था नसल्याने येथील नागरिक अंधारातच वावरत यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रभागातील नागरिकांतर्फे सामाजिक कार्यकर्त्या संजना घाटगे यांच्या हस्ते नगराध्यक्ष जयवंत भाटले, पालिका आयुक्त जगदीश हुलगेजी यांना देण्यात आले.
जत्राट वेस मधील हा परिसर बऱ्याच वर्षापासून सुविधांपासून वंचित राहिला आहे त्या परिसरात मागासवर्गीय नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असून दरवर्षी अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. या भागातील रस्ते आणि गटारी खराब झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे या परिसरात रोगराईला वारंवार आमंत्रण मिळत आहे. शिवाय पथदीपाअभावी हा परिसर नेहमी अंधारातच राहत आहे. तरी नगरपालिका प्रशासनाने तात्काळ त्या परिसरातील समस्या सोडवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष भाटले यांनी निवेदन स्वीकारून तात्काळ परिसरात सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते कन्हैया कांबळे, संदीप माने, गणेश कांबळे, प्रेमदिप कारंडे यांच्या शहर भागातील बचत गटच्या महिला सदस्या, नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta