जरारखान पठाण : रॅलीचेही आयोजन
निपाणी (वार्ता) : विखुरलेल्या बहुजन समाजाला एकत्रित आणण्याच्या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून बहुजन क्रांती मोर्चा तर्फे रविवारी (ता.१७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महापुरुषांची जयंती, तालुका स्तरीय संमेलन आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी निपाणी व परिसरातील बहुजन समाजातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन बहुजन क्रांती मोर्चा चे बेळगाव जिल्हा अध्यक्ष जरारखान पठाण यांनी केले आहे. शुक्रवारी (ता.१५) सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जरारखान पठाण म्हणाले, रविवारी दुपारी तीन वाजता नगरपालिकेजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. कित्तूर चन्नम्मा चौक, निपाणी मेडिकल, धर्मवीर संभाजीराजे चौक, महात्मा बसवेश्वर सर्कल, जत्राट वेस, गांधी चौक, कोठीवाले कॉर्नर, नेहरू चौक, चाटे मार्केट, छत्रपती शिवाजी चौक, बेळगाव नाका मार्गे मुन्सिपल हायस्कूलवर रॅलीची सांगता होणार आहे.
सायंकाळी सहा वाजता मुन्सिपल हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील बामसेफचे संचालक अभियंते मुबारक फरास यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य बहुजन मुक्ती पार्टीचे युवा आघाडी अध्यक्ष काकासाहेब जाधव, सलीम शेख, गौरव पानोरेकर, अमजदअली मुजावर, सचिन मधाळे, नागराज जयकर, सुनील लाखे, सुरज हेगडे, साहिल कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘मला सुशिक्षित लोकांनी धोका दिला’, ‘निवडणुकीतील ईव्हीएम मशीनने मताचा अधिकार शून्य केला’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे. याशिवाय तालुक्यातील बहुजन समाजाला मान्यवरांकडून मार्गदर्शन होणार आहे. तरी त्या संमेलनास परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही पठाण यांनी केले आहे.