Monday , December 8 2025
Breaking News

अलीकडच्या काळात चळवळींची धार बोथट : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Spread the love
 ‘जीवनरंग’ पुस्तकाचे प्रकाशन
निपाणी (वार्ता) : ‘जेव्हा गातो मी भिमाचे गाणे, तेव्हा डोळ्यासमोर उभे राहतात डॉ. अच्युत माने’!,
‘करू नका माझ्या भिमाचा स्वप्नभंग’ डॉ. अच्युत माने यांच्या जीवनाचे आहेत अनेक ‘रंग’, या काव्यपंक्ती ने केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करून निपाणी करांच्या टाळ्या मिळवल्या. येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा डॉ. अच्युत माने यांच्या ‘जीवनरंग’ पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजन गवस उपस्थित होते. व्यासपिठावर माजी मंत्री कुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, संजय दादा मंडलिक, वैभव काका नायकवडी, युवा नेते उत्तम पाटील, शहाजी कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले म्हणाले, प्रा. डॉ. अच्युत माने यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. फुले-शाहू-आंबेडकरांशी त्यांनी नाते जोडले आहे. सर्वांच्या प्रश्नासाठी त्यांनी अनेक चळवळीतून लढा दिला आहे. जातीअंताचा लढा यासाठी त्यांनी आयुष्यभर योगदान दिले आहे. डॉ. आंबेडकरांनीही आंतरजातीय विवाहाला प्राधान्य दिले होते. त्यांनी नोकरी सोडल्यानेच संविधानाची निर्मिती झाली. मात्र अलीकडच्या काळात चळवळींची धार बोथट होत चालली आहे. त्यासाठी तरुणांनी चळवळी उभा करण्याची गरज आहे. आंबेडकरांच्या संविधानामुळेच मोदी पुढे वाटचाल करीत आहेत अजूनही बाबासाहेबांच्या समाजाला न्याय मिळणे बाकी आहे. दलितांना उच्चशिक्षणासाठी मदत होत असल्याने समाजातील शिक्षणाचे प्रमाण वाढत चालले असून विद्यार्थ्यासाठी आणि काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रा. डॉ. राजन गवस म्हणाले, अनेक चळवळी झाल्या असल्या तरी त्यातील आशय शब्दबद्ध करणे आवश्यक आहे. समाजाचे प्रश्न पुढील पिढीला कळण्याच्या उद्देशाने प्रा डॉ अच्युत माने यांनी ‘जीवनरंग’ या पुस्तकात विविध चळवळीचा आढावा घेतला आहे. निपाणी हा परिसर चळवळीचा असूनही त्या दृष्टीने चळवळीचा वृत्तांत लिहिला गेला नाही. अजूनही गरिबांच्या प्रश्नाला वाली कुणी राहिलेला नाही विविध झालेल्या चळवळींचे पुढे काय झाले. हा प्रश्न अजूनही अधांतरीच आहे. अलीकडच्या काळात चळवळींचे आवाज क्षीण होत चालले आहेत. शिक्षणापेक्षा शिक्षण सम्राट वाढले आहेत. त्यामुळे संघटित होऊन शिक्षणासाठी संघर्ष करण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न तसेच पडून असून त्यासाठी करणाऱ्या चळवळीसाठी अशी पुस्तके प्रेरणा देणारी ठरतील. त्यामुळे चळवळीच्या विकणाऱ्या निखराला फुंकर घालण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी, निपाणी परिसर हा अनेक चळवळीचा केंद्रबिंदू आहे. डॉ. माने हे त्याचे साक्षीदार आहेत. या चळवळीला त्यांनी लिखित स्वरूपात आणले आहे त्यामुळे आता ते पुस्तकात तरुणांना प्रेरणादायी ठरेल,असे सांगितले. यावेळी प्रा.शहाजी कांबळे, युवा नेते उत्तम पाटील, संजय माने, वैभवकाका नायकवडी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रा डॉ. अच्युत माने यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
प्रारंभी अशोककुमार असू दे यांनी स्वागत केले. तर प्रा. शरद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. रामदास आठवले व व्यासपिठावर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि ‘जीवनरंग’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर अच्युत माने यांना मानपत्र आणि त्यांच्या भाव चित्राचे अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमास चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम, नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजेश गुंदेशा, राजकुमार सावंत, राजेंद्र वड्डर, मंगलराव माळगे, उत्तम कांबळे, जयराम मिरजकर, विठ्ठल वाघमोडे, विजय मेत्रांनी,  दिलीप पठाडे, सुधाकर माने, अस्लम शिकलगार, सचिन पोवार, आय. एन. बेग, प्रा. नानासाहेब जामदार, दीपक भोसले, कबीर वराळे, मल्लेश चौगुले, सुनील शेवाळे, उस्मानगणी पटेल, एस.  आर. बाईत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमोद कांबळे यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. सुरेश कांबळे यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *