
आतापर्यंत रेखाटलेली 60 चित्रे : 5 वर्षापासून जोपासलेला छंद
निपाणी (विनायक पाटील) : प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद जडलेला असतो. त्यातूनच आपली कला सर्वासमोर आणण्यासाठी धडपडत असतात. त्यातून काहीजण अर्थार्जन करून आपला उदरनिर्वाह करतात. पण आडी येथील निवृत्त मुख्याध्यापक सर्वोत्तम मधाळे यांनी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता ते गेल्या सहा वर्षापासून कार्डशिटवर पेन्सिल आर्ट करून अनेक मान्यवर व थोर साधुसंतांची हुबेहुब चित्र काढून त्यांना भेटीदाखल देण्याचा उपक्रम राबविला आहे. सर्वोत्तम मधाळे यांची ही चित्रे ’सर्वोत्तम’ असल्याने त्यांचे निपाणी व परिसरातून कौतुक होत आहे.
वयाच्या 16 व्या वर्षापासूनच सर्वोत्तम वडाळे यांना चित्रे काढण्याचा छंद जडला आहे. दहावीनंतर पुढील शिक्षण घेऊन त्यांनी प्राथमिक शाळांमध्ये ज्ञानार्जनास सुरुवात केली. आपल्या शिक्षकी पेशा मध्ये शिक्षण देण्यासह चित्रकलेची आवड असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात रंग भरला. 26 वर्षाच्या प्रकारचे शिक्षण सेवेनंतर ते निपाणी येथील जत्राटवेस शाळा क्रमांक 5 मधून निवृत्त झाले आहेत.
निवृत्तीनंतर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत त्यांनी पुन्हा आपल्या चित्रकलेला ऊर्जितावस्था देण्याचा प्रयत्न केला. गेल्या सहा वर्षापासून कार्डशिटवर पेन्सिल आर्टच्या माध्यमातून अनेक नेते मंडळी साधुसंत आणि जवानांची चित्रे त्यांनी हुबेहूब रेखाटले आहेत. त्यामध्ये संरक्षण दलाचे प्रमुख बिपिन रावत, शहीद जवान रोहित देवर्डे, एअरमार्शल अभिनंदन, सिंधुताई सपकाळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, रमाबाई आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद, संत कनकदास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,सर्वपल्ली राधाकृष्णन, छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ धर्मवीर संभाजीराजे यांच्यासह अनेकांची पेन्सिल चित्रे रेखाटून अनेक संघ संस्था मंडळ कुटुंबीयांना भेटीदाखल दिल्या आहेत.
निपाणी येथे मराठा मंडळ संस्कृतीक भवनात नुकत्याच झालेल्या प्रा. डॉ. अच्युत माने यांच्या ’जीवनरंग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात स्व-हस्त पेन्सिल आर्ट प्रतिमा भेट दिली आहे. मधाळे यांनी माने सरांच्या प्रतिमेचे हुबेहूब चित्र रेखाटण करून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, अशोककुमार असोदे, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, माजी मंत्री विरकुमार पाटील, खासदार संजय मंडलिक, युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना भेट दिली आहे.
—-
समाजासाठीही योगदान
शिक्षण सेवेत असताना सर्वोत्तम मधाळे यांनी विद्यार्थी आणि समाजासाठी मोलाचे योगदान दिले आहे. चित्रकला, विज्ञान प्रयोग निर्मिती व प्रतिकृती तयार करून आपला वेगळाच ठसा उमठवला आहे. याशिवाय भारत सेवा दलामध्येही काम केले आहे.
सेवानिवृत्तीनंतर आपला चित्रकलेचा छंद जोपसत अनेक व्यक्तींचे हुबेहूब चित्र रेखाटून त्यांना बहाल केले आले आहे.
—–

’शालेय जीवनापासूनच आपणाला चित्रकलेचा छंद होता. पण शिक्षकी पेशामध्ये वेळ कमी असल्याने हा छंद कमी जास्त प्रमाणात जोपासला पण आता निवृत्तीनंतर पूर्णवेळ पेन्सिल आर्टसाठी देत आहे. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संबंधितांची पेन्सिल चित्रे त्यांना विनामूल्य भेटीदाखल देण्याचा उपक्रम राबविला आहे.’
– सर्वोत्तम मधाळे, निवृत्त मुख्याध्यापक, आडी
Belgaum Varta Belgaum Varta