
पाठ्यपुस्तके जमा करण्याची लगबग : अनेक पालक-विद्यार्थी सहलीवर
निपाणी (वार्ता) : सलग तीन वर्षे कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देऊन ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. यंदाही कोरोनाची परिस्थिती वाढेल असा अंदाज असतानाच संसर्ग कमी झाल्याने प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. त्यानंतर पहिली ते नववी निकाल जाहीर करण्यात आला.त्यानंतर आता दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम दोन दिवसापूर्वी पूर्ण झाले असून सर्वांनाच निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दहावीचे सर्व पेपर संपले असून मूल्यमापनाचे कामही पूर्ण झाल्याने परीक्षेच्या तणावातून विद्यार्थी अखेर मुक्त झाले आहेत. परीक्षांचा शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली पाठ्यपुस्तके शाळेला जमा केली. परीक्षा संपल्याचा व उन्हाळी सुट्टी मिळाल्याचा आनंद व विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसून येत आहे. वार्षिक परीक्षा संपून उत्तरपत्रिका तपासल्याने आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. निकालासाठी काही दिवस शिल्लक असल्याने पालक आणि विद्यार्थी सहली वर जाताना दिसत आहेत. एकंदरीत वार्षिक परीक्षा संपल्याने विद्यार्थी व पालक निवांत झाले आहेत.
—–
शैक्षणिक सत्र उशिरा
कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमुळे शिक्षण विभागाने स्वच्छता व सुरक्षितता अंगी बाळगत योग्य व अचूक निर्णय घेताना कधी ऑनलाईन तर कधी ऑफलाईन पद्धतीने शिक्षणाची प्रक्रिया पार पाडावी लागली. शैक्षणिक सत्रच उशिराने सुरू झाल्याने परीक्षेलाही विलंब होत गेला. अर्थात यंदा उशिरा का होईना परंतु शाळास्तरावर लेखी वार्षिक परीक्षा घेण्यात आल्या.
—-
’ कोरोनामुळे काही काळ ऑनलाईन तर काही काळ ऑफलाईन शाळा घेण्यात आल्या. शिवाय शासनानेही अभ्यासक्रमात कपात केली. त्यानुसारच दहावीच्या परीक्षा घेण्यात आला असून मे महिन्याच्या दुसर्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.’
– रेवती मठद, गटशिक्षणाधिकारी, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta