दोन दिवसापासून शहर भगवेमय : शिवप्रेमींची अलोट गर्दी
निपाणी (वार्ता) : कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षापासून शिवजयंती उत्सव यावर मर्यादा आल्या होत्या. पण या वर्षी संसर्ग कमी झाल्याने शिवजयंती उत्सव मंडळांनी सोमवारी (ता.2) विविध उपक्रमांनी धडाक्यात शिवजयंती साजरी केली. पहाटेपासूनच ’जय भवानी, जय शिवाजी’चा गजर सुरू होता. तर दोन दिवसापासून शहरात विविध मंडळासह सार्वजनिक ठिकाणीही भगवे पताके लावल्यामुळे शहर शिवमय झाले होते. तर दिवसभर विविध पक्षाच्या नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती शिवाजी चौकात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.
पहाटे चार वाजल्यापासून शहरातील विविध शिवजयंती उत्सव मंडळांनी विविध गडावरून सवाद्य मिरवणुकीने शिवज्योती आणल्या होत्या. ठिकाणी या ज्योतींचे स्वागत करण्यात आले. सर्वच शिव ज्योती मध्यवर्ती शिवाजी चौकात आणून तेथून आपापल्या मंडळाकडे नेण्यात आल्या. शहरातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर हे भगवे ध्वज लावण्यात आले होते. त्यामुळे सर्वत्र भगवे वादळ दिसून आले. भर उन्हातही मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे पहाटेपासूनच शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या परिसरातून येणार्या सर्व शिवज्योतीचे स्वागत मान्य वरांच्या हस्ते करण्यात आले. मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाने यंदा 87 वर्षाची परंपरा राखत शिवजयंती जन्मसोहळा साजरा केला. यावेळी श्रीमंत विजयराजे देसाई सरकार निपाणकर यांच्याहस्ते शिवमुर्तीस अभिषेक, पुजा करण्यात आली. जिजामाता महिला मंडळ आणि क्रांतिज्योती महिला मंडळातर्फे य पाळणा म्हणण्यात आला.
पुणे येथील रांगोळी कलाकार साक्षी तुरटे यांनी शिवाजी महाराजांची हुबेहुब रांगोळी साकारली होती. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासुद, उपाध्यक्ष संजय माने, खजिनदार नितीन साळुंखे, सेक्रेटरी ओंकार शिंदे व मंडळाचे पदाधिकारी आणि सभासद उपस्थित होते. मंगळवारी (ता.3) शिवजयंती निमित्त सायंकाळी 5 वा. भव्यदिव्य मिरवणुक काढण्यात येणार आहे. तरी मिरवणुकीत शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
शिवजयंतीनिमित्त आमदार सतीश जारकीहोळी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, युवा नेते उत्तम पाटील, प्राणलिंग स्वामी, लक्ष्मण चिंगळे, राजेश कदम, विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई -सरकार संजय सांगावकर, नवनाथ चव्हाण यांच्यासह आजी माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर व शिवप्रेमींनी मध्यवर्ती शिवाजी चौकातील शिवमुर्तीस पुष्पहार अर्पण केला.
—
हेलिकॉप्टरचे आकर्षण
शिवजयंतीनिमित्त आमदार सतीश जारकीहोळी यांनी येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातील शिवमुर्तीच्या बाजूने तीन फेर्या काढून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला. हेच शिवजयंती कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
Check Also
तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी
Spread the love बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …