
निपाणी (वार्ता) : नरवीर तानाजी चौकातील शहर मध्यवर्ती रिक्षा चालक-मालक संघटनेतर्फे शिव बसव जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त प्रतिमापूजन व शहरातील विविध मार्गावरून रिक्षा रॅली काढण्यात आली.
छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर यांच्याहस्ते झाले. तर मध्यवर्ती शिवाजी चौकात रिक्षा महारॅलीचे उद्घाटन बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. रिक्षाची महारॅली नरवीर तानाजी चौक येथून सुरु झाली. प्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या प्रतिमेस संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. रिक्षा नगरपालिका कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस संजय शास्त्री, प्रवीण झळके यांच्या हस्ते, वीरराणी कित्तूर चन्नम्मा यांच्या प्रतिमेस अध्यक्ष गजानन खापे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण केला. धर्मवीर संभाजी महाराज चौक आणि बसवेश्वर सर्कल येथील महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस माजी अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते पुष्पहार घालून पुढे गांधी चौक, गुरुवार पेठ, दलाल पेठ येथून नरवीर तानाजी चौक येथे सर्व रिक्षा रॅली नेण्यात आली. त्यावेळी मध्यवर्ती रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. अल्पोपहाराने मिरवणुकीची सांगता करणेत आली.
Belgaum Varta Belgaum Varta