सौंदलगा : सौंदलगा येथील प्राथमिक कृषी पत्तिन संघास नाबार्डकडून मंजूर झालेल्या बहुउद्देश सेवा केंद्राच्या इमारतीचा स्लॅब भरणी शुभारंभ मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पी.के. पी. एस. चे अध्यक्ष संजय शिंत्रे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात सांगितले की, नाबार्डकडून बेळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या सहकार्यातून आमच्या संघास बहूउद्देश सेवा केंद्राच्या इमारतीसाठी 62 लाख 32 हजार कर्ज स्वरूपात मंजूर झाले आहे. यामध्ये आमच्या संघाकडून 15 लाख 62 हजार इतकी स्व भांडवलातून रक्कम घातली आहे. या इमारतीचे बांधकाम 51’ बाय 81’ फूट इतके असून जवळपास 450 मेट्रिक टन गोडाऊनची क्षमता असणार आहे. ही कर्जाची रक्कम 4 टक्के व्याजाने मंजूर झाली आहे. यामध्ये 3 टक्के नाबार्डकडून रिबेट मिळणार असून काम पूर्ण झाल्यानंतर जवळपास 25 टक्के अनुदान मिळणार आहे. यासाठी डीसीसी बँकेचे संचालक, खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
यानंतर मंत्री शशिकला जोल्ले यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन संचालिका राजश्री मोरे यांनी स्वागत केले. यावेळी मंत्री शशिकला जोल्ले यांनी स्लॅब भरणी मशीनचे पूजन केले.
यावेळी बोलताना मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या की, सौंदलगा प्राथमिक कृषी पतींची प्रगती होत असून, या संघास 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. वेळोवेळी संघाने आपली प्रगती साधली आहे.
100 टक्के कर्ज वसुली, विविध व्यवसाय व कार्यक्षम संचालक यातूनच संघाची प्रगती होत आहे. यापुढेही संघास आमचे सहकार्य राहणार असून या इमारतीच्या पहिल्या मजल्या साठी ही नाबार्डकडून प्रयत्न करून निधी मंजूर करून देऊ.
यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. संजय अडसूळ, संभाजी साळुंखे, डॉ. तानाजी पाटील, आप्पासाहेब ढवणे, सबगोंडा पाटील, महादेव कांबळे, बाळासाहेब चौगुले, विमल पाटील, अंजना सनदी, भारतसिंग रजपूत, आनंदा सुरवसे, दादासाहेब कांबळे, विक्रम पाटील, सागर पोवार, एकनाथ हातकर, केदारी माळी, मारुती साळुंखे, ग्रामपंचायत अध्यक्षा अर्चना कोगनोळे, रघुनाथ मोरे, संभाजी पाटील, मधुकर पाटील, आर. बी. मगदूम, आनंदा पाटील, कॉन्ट्रॅक्टर सागर चौगुले, अभियंता किरण नाईक, सुनील बोरगावे, बाळासाहेब काळुगडे, आनंदा गुरव, जयसिंग पाटील, यासह संघाचे सभासद उपस्थित होते.
शेवटी आभार सचिव बाळासाहेब रणदिवे यांनी मानले.