Friday , November 22 2024
Breaking News

निपाणीत डॉल्बीच्या निनादात शिवजयंती मिरवणूक

Spread the love


आकर्षक किरणांचा झगमगाट : रात्री उशिरापर्यंत मिरवणूक
निपाणी (विनायक पाटील) : काठेवाडी घोड्याचा नाच, लेझीमचा ताल, डॉल्बीचा आवाज, लेसर किरण, फिरत्या रंगमंचावरील स्क्रीन, फटाक्यांची आतषबाजी अशा बहुरंगी ढंगात निपाणीत प्रथमच मंगळवारी सायंकाळी शिवजयंतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डोळ्याचे पारणे फेडणारी ही मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाची मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध मार्गावरून ही मिरवणूक झाली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील, युवा उद्योजक अभिनंदन उर्फ बच्चू पाटील व मान्यवरांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. छोट्या तोफेतून गोळा उडवून छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा केला. यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, दादाराजे देसाई निपाणकर, विजयराजे देसाई निपाणकर, चंद्रकांत तारळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
मिरवणुकीत अग्रभागी असलेला कसबा सांगाव येथील घोड्याने हलगीच्या तालावर आकर्षक नाच करून शिवप्रेमींची मने जिंकली. तर रासाई शेंडूर येथील युवती व युवकांच्या लेझीम पथकाने शिवप्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. ठिकठिकाणी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या गजर केल्याने आसमंत दुमदुमून गेला होता. तर शिवप्रेमींनी हातात भगवे ध्वज व डोक्यावर टोप्या घातल्याने परिसर भगवामय झाला होता. मिरवणुकीच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटून शिवमुर्तीना पाणी घातले जात होते.
मध्यवर्ती छत्रपती शिवाजी मंडळाच्या मिरवणुकीत मंगळवार पेठेतील भगवा ग्रुपतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा, महादेव गल्लीतील महादेव मंदिर मंडळाचे शिव-बसव पुतळेही सहभागी झाले होते. एकंदरीत यावेळी लक्ष्मण चिंगळे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, माजी सभापती सुनील पाटील, विनायक वडे, संजय सांगावकर, शेरू बडेघर, सुनील शेलार, महेश पाटील, दिलीप पठाडे, मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, उपाध्यक्ष संजय माने, सचिव ओमकार शिंदे, उदय शिंदे, खजिनदार नितीन साळुंखे, विजयराजे देसाई निपाणकर, रवींद्र शिंदे, गोपाळ नाईक, निकु पाटील, पप्पू मोतीवाला, प्रकाश तारळे, शंतनू मानवी, निरंजन पाटील, शिरीष कमते, शौकत मणेर, राजेंद्र चव्हाण, विक्रम देसाई, संजय पावले, प्रतिक शाह, अरुण निकाडे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, आनंद कॅरकट्टी, कृष्णवेणी गर्लहोसुर व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
निपाणीच्या इतिहासात प्रथमच अशा भव्यदिव्य पद्धतीची मिरवणूक काढल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचे डोळ्यांचे पारणे फिटले. ही मिरवणूक पाहण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनीही गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

तवंदी घाटात भीषण अपघात: एकाचा मृत्यू, १५ गंभीर जखमी

Spread the love  बेळगाव : पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटात भरधाव वेगात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *