
‘मध्यवर्ती’तर्फे आयोजन: निपाणीकरांच्या डोळ्याचे फिटले पारणे
निपाणी (वार्ता) : येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे कोल्हापूर येथील सिद्धिविनायक शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केल्याने निपाणीकर यांच्या डोळ्याचे पारणे फिटले.
शिवकालीन मर्दानी प्रेक्षकांमध्ये लाठी फिरवणे, तलवारबाजी, जाळी फेक, शिवकालीन ढालीच्या माध्यमातून संरक्षण अशा विविध खेळाचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले.
प्रारंभी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर माजी आमदार काकासाहेब पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत शस्त्रांचे पूजन करण्यात आले. यावेळी पारंपारिक हलगी, ताशा, खताळ याच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील शिवकालीन मर्दानी खेळाचे विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर करून शिवकालीन दृश्य डोळ्यासमोर उभे केले. मर्दानी खेळ पाहण्यासाठी निपाणीसह परिसरातील शिवभक्त शिवप्रेमींनी मोठा सहभाग नोंदवला होता.
कार्यक्रमास चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, नगरसेवक रविंद्र शिंदे, गोपाळ नाईक, श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार, मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद, उपाध्यक्ष संजय माने, सेक्रेटरी नितीन साळुंखे, किरण कोकरे, ओंकार शिंदे यांच्यासह मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta