डॉ. आंबेडकर विचार मंचतर्फे आयोजन : महाड- रायगडला रवाना
निपाणी : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती निमित्त एक वैचारिक संदेश समाजाला मिळावा यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्यावर प्रस्थापित वर्ण व्यवस्थेने हक्क नाकारला होता. तो आमचा नैसर्गिकदृष्ट्या अधिकार आहे हे सांगण्यासाठी व समता प्रस्तापित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या ऐतिहासिक ‘चवदार तळ्याचा सत्याग्रह’ करून प्रस्थापित व्यवस्थेला धक्का दिला व दलितांना स्वतःची जाणीव करून दास्य मुक्तीचा संदेश दिला.
त्याचबरोबर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्यावरील समाधी क्रांतीबा जोतिबा फुले यांनी शोधून खऱ्या अर्थाने या देशात सर्व प्रथम शिवजयंती उत्सव सुरू केला. या ऐतिहासिक रायगड किल्ला आणि महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाचा इतिहास आत्मसात करण्यासाठी निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांच्या संकल्पनेतून दास्य मुक्तीकडून संघर्षाकडे या उपक्रमाव्दारे बेळगाव जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यातील दोनशे तरुण महाड रायगड प्रवासाकरिता रवाना झाले.
प्रारंभी रविवारी सकाळी 7 वाजता येथील नगरपालिका नजीक असणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वागत अमित शिंदे यांनी केले. प्रा. सुरेश कांबळे यांनी या दोनदिवसीय प्रवासाचे स्वरूप सांगितले. या प्रवासादरम्यान कोल्हापूर येथे जाऊन आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाला भेट देऊन अभिवादन केले. त्याचबरोबर शाहू महाराजांनी सामाजिक विषमता नष्ठ करण्यासाठी हॉटेल काढून दिलेल्या गंगाराम कांबळे यांच्या समाधीला देखील अभिवाद करुन रायगड महाड पुढील प्रवासाला निपाणी सिमाभागातून दोनशे तरुण रवाना झाले.
यावेळी कोल्हापूरात आल्यानंतर कोल्हापूर येथील समृध्दी महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्वाती काळे यांनी भेट देऊन स्वागत केले. याप्रसंगी आरपीआय नेते सतिश माळगे, सुधाकर माने, रमेश देसाई, प्रा.भारत पाटील, संजीवकुमार शितोळे, संजय शैवाळे, विजय मेत्राणी यांच्यासह निपाणी सीमाभागातील पुरोगामी चळवळीतील पदाधिकारी आणि आंबेडकर विचारमंचचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.