दलित नेते मल्लेश चौगुले : निपाणीत कार्यकर्त्यांची बैठक
निपाणी (वार्ता) : भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेलेल्या कर्नाटकातील सुमारे दहा ठिकाणी स्मारक बांधण्यासाठी कर्नाटक सरकारने १०० कोटी तरतूद केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निपाणी येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण होणार असल्याची माहिती बेळगाव येथील दलित नेते मल्लेश चौगुले यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
मल्लेश चौगुले म्हणाले, या उपक्रमासाठी कर्नाटक राज्य प्रमुख श्रीधर कलिविर यांनी कर्नाटकातील दहा ठिकाणी या स्मारकासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीच्या राज्य उपाध्यक्ष पदी प्रा.सुरेश कांबळे व विजय मेत्रानी यांची निवड केले आहे. त्यामुळे निपाणीत होणाऱ्या स्मारकासाठी प्रत्येकानी सहकार्य करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते विजय मेत्रानी म्हणाले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निपाणी मध्ये बऱ्याच भेटी दिल्या आहेत. म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगनावरील त्यांची सभा ऐतिहासिक झाली होती. बेळगाव जिल्ह्यातील दलीत नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली येथील डॉ. आंबेडकरांचे स्मारक साकारणार आहे. त्यामुळे त्यांच्या कार्याची प्रेरणा दलित समाजाला मिळणार आहे.
यावेळी शासनाकडून सुमारे १० कोटी रुपयाचा वाढीव निधी मिळावा. त्याच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, युवकांसाठी यूपीएससी एमपीएससी केंद्रांची निर्मिती, सुसज्ज ग्रंथालय, विविध चळवळीसाठी सुसज्ज भवन, आकर्षक गार्डन, अशा पद्धतीच्या स्मारकाची निर्मिती व्हावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
बैठकीस डॉ. आंबेडकर विचार मंच संस्थापक अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते अशोक लाखे, सुधाकर माने, रवी श्रीखंडे, आरेस सनदी, रमेश कांबळे, अमित शिंदे, दीपक शेवाळे, संतोष कांबळे, किशन दावणे, राजीव कांबळे, मिथुन माधाळे, बबन भोसले, प्रवीण सौंदलगे, सर्जेराव हेगडे यांच्यासह आंबेडकर समुदायाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta