गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार : सामाजिक कार्याची दखल
निपाणी(वार्ता) : प्रख्यात रत्नशास्त्री एच. ए. मोतीवाला यांच्या देहावसानानंतर त्यांच्या विद्येचा, सामाजिक कार्याचा वारसा जतन करीत अखंडपणे रत्नसेवेतून जनसेवेचे उत्तुंग कार्य साकारणारे त्यांचे सुपुत्र ए. एच. मोतीवाला यांच्या या क्षेत्रातील अलौकिक कार्याला अनुसरून त्यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील ‘दि. प्राईड ऑफ इंडिया भास्कर’ अवॉर्ड गोवा (साखळी) येथे आयोजीत कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर मनोगतातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढतांना म्हणाले, रत्नशास्त्र हा जोतिष्य शास्त्रातील महत्वाचा भाग आहे. गेल्या ५ पिढ्यांपासून रत्नशास्त्री मोतीवाला परिवाराने ही रत्नशास्त्राची अलौकिक कला आत्मसात करून ती जपली आहे. त्या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविल्या आहेत. अचूक हस्तशास्त्र आणि योग्य रत्न परिधानाचे मौलिक मार्गदर्शन करीत त्यांना आयुष्यातील प्रत्येक संकटाला धीरोदत्तपणे सामोरे जाण्यासाठी प्रेरित केले आहे. त्यांच्या विविध सामाजिक कार्यामुळेच आज त्यांच्या पाचव्या पिढीचा ग्राहकविस्तार कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, सिंधुदुर्ग येथे हजारोंच्या संख्येने विस्तारला आहे. एच. ए. मोतीवाला यांच्या जनसेवेच्या सन्मानार्थ आजपर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय राज्य स्तरावरील पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवित त्यांचे वारसदार रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांची यशस्वी वाटचाल सुरू आहे. एच . ए . मोतीवाला यांच्या आदर्शानुसारच वाटचाल करीत त्यांची वाटचाल यशाची शिखरे गाठण्याकडे सुरू असून आगामी काळात त्यांच्या रत्नविद्येच्या, रत्नशास्त्राच्या माध्यमातून जनकल्याणाचे कार्य निरंतर घडत राहो अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
पुरस्काराने रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला यांचा सन्मान करण्यात आल्याने निपाणी, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, सातारा, परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
याप्रसंगी गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव लोहार यांच्यासह कला, क्रिडा, सांस्कृतिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
