बेळगाव : शहर आणि परिसरात काही वेळा गुन्ह्यांचे गंभीर प्रकार घडत आहेत. अशा वेळी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाला योग्य माहिती द्यावी. अशी सूचना शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आली. येथील समादेवी मंगल कार्यालयात बुधवारी सकाळी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलिस अधिकारी वर्गाने नागरिक प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. तसेच कोणत्याही प्रकारे शहर परिसरात योग्य नियोजन आणि कायदा व्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. शहर परिसरातील पोलिस दलाने विशेष पाहणी मोहीम सुरू केली आहे. बाजारपेठेत सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. व्यापारी वर्गाने देखील स्वतः आपल्या सुविधेसाठी सीसीटीव्हीचे यंत्रणा बसवून घ्यावी. कोणत्याही प्रकारे कायदा-सुव्यवस्थेचा धक्का पोहोचू नये यासाठी नागरिकांकडून सहकार्याची गरज आहे, असे विचार एसीपी चंद्रप्पा यांनी व्यक्त केले. यावेळी रहदारी विभागाचे शरणाप्पा, पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नागरिक प्रतिनिधी सुनील नाईक, राम पुजारी, संतोष दरेकर, विकास कलघटगी यांनी चर्चेत भाग घेतला.
