चंद्रकांत निकाडे : कुर्ली हायस्कूलमध्ये कथालेखन कार्यशाळा
निपाणी (वार्ता) : समाज जो जगतो त्याचे प्रतिनिधीक साहित्यातून पुढे येत असते. सध्याच्या धावपळीच्या काळात वाचन व लेखन याकडे दुर्लक्ष होत आहे. कथा लेखकांनी माणसांच्या वेदनावर वास्तव लिहिले पाहिजे. यासाठी आपल्या लेखणीतून माणसाच्या काळजाला भिडणारे कथालेखन निर्माण करावे, असे मत ज्येष्ठ बाल साहित्यीक चंद्रकांत निकाडे यांनी व्यक्त केले. ते कुर्ली येथिल सिद्धेश्वर विद्यालयात अयोजित कथालेखन कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी. एस. पाटील हे होते.
एस. एस. चौगुले यांनी स्वागत करून कार्यशाळेची माहिती दिली. रोपास जलार्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
निकाडे म्हणाले, कथेच्या वाचनामुळे वाचकांच्या मनात सद्भाव, सद्विचार वाढतो. नैतिक व बोधवादी दृष्टिकोणामुळे कथा लोकांवर परिणाम करतात. तंत्रशुद्धता, रेखीवपणा, डौलदारपणा व लालित्यपूर्ण भाषा यामुळे कथा प्रेरणादायी बनत असल्याचे सांगितले. त्यांनी स्वरचित कथेचे रसाळ भाषेत कथाकथन सादरीकरण करून लघुकथेच्या तंत्राचा ऊहापोह केला. लघुकथेची सुरुवात आकर्षक पाहिजे. तिचा शेवट परिणामकारक असावा. तिच्या कथानकात निरगाठ, गुंतागुंत व उकल असावयास हवी. कमीत कमी पात्रप्रसंगांच्या साहाय्याने ती सांगितली गेली पाहिजे याचे प्रत्यक्षिकासह सादरीकरण केले.
याप्रसंगी टी. एम. यादव, एस. ए. पाटील, एस. जी. लिंबिगीडद, यु. पी. पाटील, आर. आर. मोहिते, यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी सूत्रसंचालन केले. ए. ए. चौगुले यांनी आभार मानले.