कोगनोळी : आप्पाचीवाडी व हदनाळ कर्नाटक सीमाभागातील दोन्ही गावातील बरेच विद्यार्थी हे कागल येथील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात. परंतु सध्या कागल आगाराकडून आप्पाचीवाडी-म्हाकवेमार्गे हदनाळ या गावाला ठराविक बसफेऱ्या सोडून विद्यार्थांच्या सकाळच्या कॉलेजच्या वेळेत व दुपारी परत गावाकडे येण्याच्या वेळेत एसटी बससेवा नसल्याकारणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गैरसोय होत आहे. ही समस्या लक्षात घेऊन आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे कागल आगारप्रमुखांना भेटून विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन बसफेऱ्या चालू करुन समस्या दूर करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
हे निवेदन स्विकारुन वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन तात्काळ बससेवा उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपाध्यक्ष आनंदा कुवाळे, धनाजी पाडेकर, शाहू जाधव, बाबूराव शेटके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta