पिकांना पोषक वातावरण : शेतकरी वर्गातून समाधान
कोगनोळी : कोगनोळी सह परिसरातील हणबरवाडी, दत्तवाडी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी, हदनाळ आदी परिसरात सोमवार तारीख चार पासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
सुरुवातीला झालेल्या पावसामुळे या विभागातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरणी करून घेतली होती. त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने दडी मारली होती. पाण्याची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला पाणी देऊन जोपासले होते. माळरानावरील सोयाबीन पिकांना मोठ्या पावसाची नितांत गरज होती. सोमवार तारीख 4 व मंगळवार तारीख 5 रोजी सलग दोन दिवस या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. झालेल्या या पावसामुळे सोयाबीन पिकासह अन्य पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या परिसरातील सोयाबीन पिके जोमात आहेत. ढगाळ व पावसाळी वातावरण पिकांना पोषक ठरत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta