सौंदलगा : सौंदलगा येथे शेतात बांधलेल्या जनावरांचा निवारा पडून संदीप रवींद्र पाटील यांची म्हैस दगावली. सौंदलगा येथील शेतकरी संदीप पाटील यांनी शेतात जनावरांसाठी अड्डा केला होता. मात्र दोन दिवस जोरात झालेल्या पावसामुळे बांधलेला निवारा पडल्यामुळे एक म्हैस दगावली असून बाकीच्या एक म्हैस व दोन रेडके जखमी झाले आहेत. या पडलेल्या घरामुळे व मृत्यू पावलेल्या म्हशीमुळे या शेतकऱ्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की रात्री संदीप पाटील हे जनावरांना वैरण घालून घरी आले होते. सकाळी शेतात गेल्यानंतर जनावरांचे पडलेले घर व मृत्यू पावलेली म्हैस पाहून त्यांना मोठा धक्का बसला. यावेळी शेजारी शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य संजय कोळी यांनी पाहून तलाठी एस. एम. पोळ यांना कळवले. त्यानंतर महसूल खात्याचे तलाठी एस.एम पोळ, सहाय्यक नंदकुमार पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कंकणवाडी यांनी पाहणी करून त्या म्हशीचे पोस्टमार्टम केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, विक्रम पाटील यासह शेतकरी मदतीस धावून आले.
Belgaum Varta Belgaum Varta