चिमुकल्यांनी केल्या वेशभूषा : शाळेभोवती रिंगण सोहळा
निपाणी (वार्ता) : अंगात पांढरे सदरे घातलेले विद्यार्थी, गळ्यात टाळ, विठ्ठल -रुक्मिणीची वेशभूषा, डोक्यावर तुळस, हातात भगवा पताका, विठू माऊलीचा जयघोष, शाळेभोवती रिंगण सोहळा अशा भक्तिमय वातावरणात येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी सादर केलेला आषाढी एकादशीचा देखावा पालकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.
प्रारंभी विद्यार्थ्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राचार्या चेतना चौगुले यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी चे महत्व स्पष्ट करून भजन सादर केले. त्यानंतर किरकोळ पाऊस सुरू असतानाही विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळस घेऊन शाळेभोवती रिंगण सोहळा पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी फुगडी खेळही सादर केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे सेक्रेटरी अमर चौगुले यांनी सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वर्षी प्रत्यक्षात रिंगण सोहळ्यासाठी अश्व आणून विद्यार्थ्यांना ‘याची देहा, याची डोळा’ रिंगण सोहळा दाखविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम पाटील, स्वाती पठाडे, ज्योती चवई, पूजा वसेदार, निकिता आवळे, शिल्पा तारळे, विद्या गायकवाड, माधुरी लोळसुरे, भाग्यश्री शिंदे, सुवर्णा भोपे, नाजनीन होसुरे, मारुती महाजन, साधना रोडुनावर यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Belgaum Varta Belgaum Varta