तहसीलदार डॉ. मोहन भस्मे : बोरगावात सफाई कामगार दिन
निपाणी : कोरोना महामारीत आपले गाव निरोगी रहावे, नागरिकांना संसर्ग होऊ नये, यासाठी शहरातील सफाई कामगारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. गटार, रस्ता, परिसर स्वच्छता करून प्रामाणिकपणे कार्य केले आहेत. त्यामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. तेच खर्या अर्थाने देवदूत आहेत महामारी काळातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन निपाणीचे तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांनी केले. बोरगाव येथील नगरपंचायत कार्यालयमध्ये नगरपंचायतीतर्फे सफाई कामगार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून तहसीलदार डॉ. मोहन भस्मे बोलत होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
तहसीलदार डॉ. भस्मे म्हणाले, मंदिरातील भगवंतांच्या नंतर सफाई कामगार स्वच्छतेला प्रथम प्राधान्य देत आहेत. यासाठी सर्वांनी स्वच्छतेला प्राधान्य देऊन आपले आरोग्य, घर, परिसर ,गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. लोकांची सेवा करणारे हेच खरे सफाई कामगार आहेत. आपण शासकीय कर्मचारी असलो तरी तळागाळात पोचून स्वच्छतेचा संदेश देणारे हे सफाई कामगारच आहेत. त्यासाठी सफाई कामगारांना त्यांनी करत असलेल्या कामांना प्रोत्साहन दिले तरच खर्या अर्थाने सफाई कामगार दिन साजरा केल्यासारखा होईल. दोन वर्षातील कोरोना महामारीत कोरोना सोडले तर सफाई कामगारमुळे दुसर्या कोणत्याही रोगांचा प्रादुर्भाव शहरात झालेला नाही.
सफाई कामगार दिनाचे औचित्य साधून सर्वच सफाई कामगारांचा अभिनंदन पत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सफाई कामगारांनी मनोगत व्यक्त करून शहराच्या स्वच्छतेसाठी आपण प्रामाणिक कार्य केल्याचे सांगितले.
कार्यक्रमास नगरपंचायत अधिकारी राहुल गुडयिनकर, पोपट कुरळे, सुभाष गजरे, संदीप वाईंगडे, विजय चौगुले, अमोल दत्तवाडी, निलेश उरणकर, आरोग्य विभागाचे आर. एच. तीप्पेमनी, रश्मी भिमन्नवर, विलास माळी, रुकमन गजरे, हिम्मत अफराज, अरुण शिंगे, बाळाबाई कांबळे, हौसाबाई शिंगे यांच्यासह सफाई कामगार उपस्थित होते.
