अध्यक्षपदी सुरेखा सूर्यवंशी : समान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निवड
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्याचे लक्ष लागलेल्या आणि अत्यंत चुरशीने गुरुवारी (ता.२८) झालेल्या लखनापूर- पडलीहाळ ग्रामपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेखा नारायण सूर्यवंशी यांनी बाजी मारली. त्यामुळे ग्रामपंचायतीवर उत्तम पाटील गटाच्या काँग्रेसचे वर्चस्व अबाधित राहीले आहे. लखनपूर ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक अधिकारी पाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता जी. डी. म्हंकाळे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ झाला. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत दोन्ही गटाच्या उमेदवारांना समान मते पडली. त्यामुळे अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे मतदान घेतल्यानंतर त्यामध्ये काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागली. तर भाजपचे दिलीप कांबळे पराभूत झाले. यावेळी उत्तम पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालाची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला.
यापूर्वी लखनापूर -पडलिहाळ ग्रामपंचायतीवर ६ सदस्यासह काँग्रेसची सत्ता होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात एस्सी आरक्षणानुसार अध्यक्षपदी रुक्मिणी भोसले यांची निवड झाली होती. त्यांचा सव्वावर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात सुरेखा सूर्यवंशी यांना अध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरले होते. त्यानुसार भोसले यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच विद्यमान ग्रामपंचायत उपाध्यक्षा लक्ष्मी मगदूम यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे दोन्ही बाजूचे संख्याबळ समान झाले. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याचा अंदाज बांधणे कठीण झाले होते. गुरुवारी दुपारी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून सुरेखा सूर्यवंशी तर भाजपकडून दिलीप कांबळे यांनी अर्ज दाखल केले. यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेत दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी पाच अशी समान मते पडली. अखेर निवडणूक अधिकाऱ्यांनी चिठ्ठीद्वारे निवड घोषित करण्याचे ठरवले. त्यानुसार अनुराग विठ्ठल कांबळे या मुलाने चिठ्ठी उचलली यामध्ये काँग्रेसच्या सुरेखा सूर्यवंशी यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने त्यांची निवड झाली.
यावेळी नूतन अध्यक्षा सुरेखा सूर्यवंशी यांचा युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल. यावेळी उत्तम पाटील म्हणाले, निपाणी मतदारसंघात विरोधकांकडून अत्यंत हिन दर्जाचेराजकारण सुरू आहे. गावात विकास कामे करत असताना गट – तट बाजूला ठेवून कामे करण्याची गरज आहे. सत्ताधारी गटाच्या सर्व सदस्यांनी जनतेच्या विश्वासाला पात्र राहून प्रामाणिकपणे गावचा विकास साधावा. यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील प्रा. सुभाष जोशी यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विनायक पाटील, मल्लिकार्जुन शिंदे, समित सासणे, गीता नाईक, दिलीप कांबळे, संभाजी पाटील, बेबीजान शिरकोळी, राजू पाटील, निरंजन पाटील-सरकार, शिरीष कमते, इमरान मकानदार, राजू पाटील, अनिल संकपाळ, श्रीनिवास संकपाळ, अमित शिंदे, सुनील कांबळे,
निकु पाटील, दयानंद पाटील, दयानंद भराडे, सदानंद भराडे, ओंकार चौगुले, संजय कमते, संतोष मोरे, रणजीत जाधव यांच्यासह उत्तम पाटील प्रेमी गट व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta