सौंदलगा : येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि कन्नड शाळेसाठी ग्रामपंचायत एन.आर.जी. फंडातून मंजूर झालेल्या स्वयंपाक खोलीच्या बांधकाम कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित करण्यात आला. सुरुवातीला एसडीएमसी अध्यक्ष शंकर कदम यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अश्विनी सनदी, शोभा कोळी, एसडीएमसी सदस्या प्रियंका कोळी, शिक्षिकांच्या हस्ते जागेचे पूजन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. त्यानंतर मराठी शाळा मुख्याध्यापक धनंजय ढोबळे व कन्नड शाळा मुख्याध्यापक मोकाशी यांच्या हस्ते कुदळ मारून स्वयंपाक खोली बांधकाम कामाचा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभ प्रसंगी येथील सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कोगनोळे यांनी सांगितले की, कन्नड शाळा व मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी जेवण तयार करण्यासाठी जी खोली होती ती आता जीर्ण झाली असून त्याची जागा पण स्वयंपाक करण्यासाठी अपुरी पडत आहे. त्यासाठी ग्रामपंचायत एन.आर.जी. फंडातून ही नवीन स्वयंपाक खोली बांधण्यात येणार असून ती २५ फूट बाय ४२ फूट इतकी खोली बांधण्यात येणार आहे. ही इमारत लवकरात लवकर पूर्ण करून स्वयंपाकाची समस्या लवकरच मिटणार आहे. यासाठी मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले, ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य मिळालेले आहे. यावेळी माजी एपीएमसी सदस्य संजय शिंत्रे, माजी तालुका पंचायत सदस्य आप्पासाहेब ढवणे, कन्नड शाळा एसडीएमसी अध्यक्ष वासु भानसे, ग्रामपंचायत सदस्य अरुण शिंदे, विक्रम पाटील, चंद्रकांत पाटील-सुभान, जीवक पाटील, भीमा भानसे, उत्तम कुंभार, बी.आर. चौगुले, किरण काळूगडे, संजय कोळी, शरद चौगुले, अनिल शेवाळे, विनोद कांबळे, शिवाजी भानसे, अरिफ मुल्ला, सागर पोवार, मिथुन कांबळे, दत्ता बोरगावे, गणपती कोठवाळे, रघु मोरे, अजित शिगावे, श्रीकांत संनदी यासह शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta