डॉ. अच्युत माने : मेजर गजानन चव्हाण यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : कोणत्याही कार्यात संघटना असेल तर ते कार्य नेहमी तडीस जाते. त्याचे खरे कौशल्य जवानांमध्ये आहे. खऱ्या अर्थाने प्रातिनिधीक स्वरुप हा देशाचा सन्मान आहे. आजच्या तरुण पिढीला आदर्शवत वाटावा असा ऐतिहासिक ठेवा मेजर गजानन चव्हाण यांनी निर्माण केला आहे. आजच्या युवकांनी देशी सेवा करण्याकडे वळण्याचे आवाहन प्रा.डॉ. अच्युत माने यांनी केले. निपाणी येथील सुपुत्र मेजर गजानन चव्हाण यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या दक्षिण आफ्रिका कार्गो येथील शांती सेनेत ‘सुभेदार मेजर’ हा बहुमान मिळाला आहे. त्यानिमित्त त्यांचा विविध मंडळी व संघटनेतर्फे येथील रोटरी हॉलमध्ये सत्कार करण्यात आला त्यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. माने बोलत होते.
प्रा आनंद संकपाळ म्हणाले, सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा गौरव म्हणजे संपूर्ण निपाणीकरांचा गौरव आहे. यामध्ये देशासाठी शांतीसेनेत अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सैनिकांचा सन्मान आहे. तो सर्वसमावेशक आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रा. एन.आय. खोत यांनी ‘जय जवान जय किसान’ चा उल्लेख करुन हा सन्मान स्वाभिमानी शेतकरी सेवकांचे वतीने होतो आहे. प्रत्येकाने आपला देश आणि देशासाठी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांचा अभिमान बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी भाऊसाहेब झिनगे, डॉ. राजेश बनवन्ना, राजेश शेडगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे, प्रणव मानवी यांनी मनोगत व्यक्त केले.
सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांनी आपली बत्तीस वर्षाची सेवा व शांतीसेनातील सैनिक यांच्या विषयी तेथील खडतर जीवनाविषयी सांगुन स्वातंत्र्य सैनिक वडीलांचा वारसा व समाज जीवनात मिळत असलेल्या पाठिंबा या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
निपाणी शहर व परिसरातील मान्यवर, मंडळांच्या वतीने सुभेदार मेजर गजानन चव्हाण यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास दिपक इंगवले, बाळासाहेब कळसकर, अमर पाटील, निकु पाटील, नगरसेविका अनिता पठाडे, महात्मा बसवेश्वरचे संचालक प्रताप पट्टनशेट्टी, गजानन शिंदे, धनाजी भाटले, सुधाकर माने, प्रा. मधुकर पाटील, बसवराज जडी, मल्लाप्पा तावदारे, वसंत नगरे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. अमृता संकपाळ हिने सूत्रसंचालन केले. बाबासाहेब मगदुम यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta