प्रा. सुरेश कांबळे : शिष्टमंडळाची जिल्हाधिकाऱ्यांना भेट
निपाणी (वार्ता): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात विविध ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र व स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात निपाणी शहराला १ कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधून निपाणी शहरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक होणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती डॉ. आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष व स्मारक कमिटी सदस्य सुरेश कांबळे यांनी दिली.
जिल्हा अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्मारक समिती सदस्यांची एक व्यापक बैठक घेण्यात आली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जागेवरच स्मारक निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या स्मारकाचा निपाणी व ग्रामीण भागातील समाज बांधवांना चांगला उपयोग होणार आहे. सध्या जागेचा शोध सुरू असून लवकरात लवकर आणखीन निधी मिळाल्यानंतर या कामाला प्रारंभ होणार आहे. स्मारकामुळे निपाणीच्या वैभवात भर पडणार असून दलित युवकांना प्रेरणादायी ठरणार असल्याचेही प्रा. कांबळे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, महानगरपालिका आयुक्त, निपाणी, चिकोडी व बेळगाव येथील तहसीलदार, जिल्ह्याचे दलित नेते मल्लेश चौगुले, डॉ. आंबेडकर विचार मंचचे प्रवीण माने, अमित शिंदे, दीपक शेवाळे, राहुल भोसले उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta