लाखो रुपयांचे नुकसान, घरांचा पंचनामा करण्याची मागणी
कोगनोळी : हदनाळ (तालुका निपाणी) येथे अतिवृष्टीमुळे पाच घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.
घरांचा पंचनामा अद्याप झालेला नसून यावर्षी तरी पारदर्शी पंचनामा होणार का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
जुलै महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हदनाळातील संभाजी रामू शेटके, खंडू धोंडी पाटील, विठ्ठल गुंडू पाटील, सदाशिव राऊत, सुवर्णा पांडूरंग पाटील यांच्या घरांची पडझड होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरांची पडझड होऊन १५ दिवस उलटले तरी कोणतेही शासकीय अधिकारी अथवा ग्रामपंचायतीच्या विकास अधिकाऱ्यांनी गावात भेट देऊन पडझड झालेल्या घरांची पाहणी व यादी तयार केलेली नाही.
गेल्या वर्षी शासकीय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने यादी तयार करुन पडझड न झालेल्या लाभार्थींना लाखो रुपयांचा लाभ मिळवून दिला होता. यावर्षीही घरांची पडझड झालेली असताना गतवर्षीप्रमाणेच यादी तयार केली आहे का? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
तरी आप्पाचीवाडी ग्रामपंचायत प्रशासनाने पडझड झालेल्या घरांची पाहणी करावी आणि योग्य तो पंचनामा करुन नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
————————————————————–
तर तीव्र आंदोलन करणार
गेल्या वर्षी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ग्रामपंचायत अध्यक्ष व सदस्यांनी पडझड झालेल्या घरांची यादी न करता राजकीय सत्तेचा गैरवापर करुन चुकीच्या मार्गाने लाभार्थ्यांना लाखो रुपयांचा लाभ मिळवून दिला होता. यावर्षी असाच प्रकार घडल्यास या विरोधात तहसीलदार कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे उत्तमआण्णा युवा मंचचे अध्यक्ष मधुकर पाटील व रयत संघटनेचे अध्यक्ष सदाशिव शेटके यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले.
————————————————————–
योग्य लाभार्थींनाच लाभ मिळणार
यावर्षी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या लाभार्थ्यांची निवड करताना प्रशासकीय अधिकारी, ग्रामपंचायतीचे सदस्य, गावातील सर्व गटाचे कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करणार असून योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील असे हदनाळचे ग्रामपंचायत सदस्य तुकाराम शेटके यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta