शस्त्रासह दुचाकी ताब्यात : कागल पोलिसांची कारवाई
निपाणी (वार्ता) : बेकायदेशीररित्या शस्त्रांची विक्री करणाऱ्या तरुणास कागल येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून २३ धारदार तलवारी एक दुचाकी असा सुमारे ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विजयसिंग तुफानसिंग कलानी (वय २२, रा. आश्रयनगर निपाणी) असे त्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, आगामी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शस्त्रांच्या तस्करीवर तसेच विक्रीवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले होते. यानुसार कागल येथील स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास एक तरुण कागल येथील दूधगंगा नदीजवळ तलवार विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने या ठिकाणी सापळा रचून विजयसिंग कलानी यास ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे २३ धारदार तलवारी, एक दुचाकी जप्त केली.
पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार खंडेराव कोळी, चंदू ननवरे, कुमार पोतदार, प्रदीप पोवार, संजय पडवळ, संतोष पाटील यांनी ही कारवाई केली. कागल पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाला आहे.
————————————————————–
महामार्गावर धारदार शस्त्रांची विक्री
पुणे -बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हालसिद्धनाथ सहकारी कारखाना ते यमगरणी रस्त्यावर ट्रक चालकांची वर्दळ असते. ही संधी साधून काही व्यवसायिक धारदार शस्त्रे भर रस्त्यावर थांबून विक्री करीत आहेत. त्याची खरेदी विक्री रोज होत आहे. याकडे निपाणी पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया शहरवासीयातून उमटत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta