सौंदलगा : येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाजामार्फत श्रावणातील पहिला सण नागपंचमी उत्साहात साजरा करण्यात आला. श्रावणातील या पहिल्या सणासाठी माहेरवाशींनी आवर्जून उपस्थित असतात. महिला वर्ग व लहानमुली सुद्धा साडी नेसुन झिम्मा- फुगडी, झोपाळा खेळत होत्या. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी नाभिक समाजामार्फत नागपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी प्रथमेश मित्र मंडळ कुंभार गल्लीपासून विठ्ठल मंदिरापर्यंत नागोबा मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी महिलांनी पाणी घालून औक्षण केले. त्यानंतर नागोबा मूर्तीचे ग्रामपंचायत पटांगण येथे रामदास सूर्यवंशी व प्रवीण जाधव यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तर बावचे यांच्या प्रांगणातील नागोबा मूर्तीची पूजा सौ.व श्री.किरण बावचे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बावचे दाम्पत्याकडून नागोबासाठी विशेष असा मंडप सेट देण्यात आला. याप्रसंगी गावातील नागरिकांनी येथे दर्शन घेऊन नैवेद्य अर्पण केला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिवाजी सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, मनोज सूर्यवंशी, हरी यादव, शिवाजी यादव, आनंदा सुर्यवंशी, गिरीश सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, उत्तम सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी, विनायक माने, भूषण सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, तनुष्का जाधव तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
सौंदलगा, फोटो : नागोबा मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढतेवेळी नाभिक समाज बांधव