कोगनोळी : येथील सार्थक दिनकर माने या सोळा वर्षीय विद्यार्थ्यांला सापडलेले चार हजार रुपये प्रामाणिकपणे परत केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
आजच्या जमान्यात मिळालेली रक्कम व वस्तू परत मिळणे फार दुर्मिळ झाले आहे. अनेक वेळा पैसे व वस्तू गहाळ झाल्यास मिळणे कठीण असले तरी जगातील सर्वच प्रामाणिक माणसे संपली असे म्हणता येणार नाही. असा किस्सा नुकताच कोगनोळी येथे घडला.
येथील शेतकरी व पिठाची चक्की व्यवसायिक राजू मोनाप कोगनोळी येथील माने गल्लीत शेतमजुराना पगार देण्यासाठी गेले होते. यादरम्यान त्यांच्या खिशातील चार हजार रुपये रस्त्यावर पडले. परत व्यवसायाच्या ठिकाणी आले असता पैसे पडल्याचे लक्षात आले. परत त्या ठिकाणी जाऊन शोधाशोध करत असताना सोळा वर्षाचा नववी मध्ये शिकत असलेला सार्थक दिनकर माने यांनी आपल्याला पैसे सापडले असल्याचे त्यांना सांगितले व परत दिले.
याबद्दल राजू मोनाप यांनी त्याचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी वडील दिनकर माने, आई लता माने, नंदकुमार मळगे, विनायक मळगे, पत्रकार अनिल पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta