
व्यवसायिकही अडचणीत : विद्यार्थ्यांचाही होणार खिसा रिकामा
निपाणी (वार्ता) : दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, स्वयंपाक गॅस, जीवनावश्यक वस्तू सह घरात लागणार्या प्रत्येक वस्तूंच्या किमतीत वाढ होत चालली आहे. त्याचा सर्वसामान्य कुटुंबियांना चांगलाच फटका बसत या महागाईच्या फेर्यातून शासकीय व इतर कामासाठी दैनंदिन गरज बनलेल्या झेरॉक्सला लागणारा पेपरही सुटलेला नाही. त्यामुळे निपाणी शहर व परिसरातील झेरॉक्स व्यवसायिकांना दर वाढवावे लागत आहेत. विद्यार्थी व नागरिकांवर भर पडणार आहे.
वाढत्या महागाईमुळे सर्व सामान्य जनता मेटाकुटीस असताना झेरॉक्स सेंटरसाठी लागणार्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. त्यामुळे व्यवसायिकही अडचणीत सापडले आहेत. व्यवसायिकांनी किरकोळ वाढ केली असली तरीही दुकानदार व ग्राहक यांच्यात हुज्जत होताना दिसत आहे. 2000 साली एक पेपर रीम 100 रुपयाला मिळत होती. तेव्हा झेरॉक्सचे दर प्रतिकॉपी 1 रुपये होते. मध्यंतरी त्यामध्ये वाढ झाले असतानाही व्यवसायिकांनी झेरॉक्स कॉपीमध्ये दरवाढ केलेली नव्हती. पण आता तिच रीम 240 रुपये झाली आहे. त्यामुळे एका रीम मागे व्यवसायिकांना140 रुपये जादा मोजावे लागत आहेत. परिणामी झेरॉक्स दर वाढवल्याशिवाय व्यवसायिका समोर दुसरा पर्याय उरलेला नाही.
दुकान गाळा भाडे, डिपॉझिट रक्कम, विज बील, झेरॉक्ससाठी लागणारी काळी आणि रंगीत शाई व दुरुस्ती कामामध्ये दरवाढ झाली आहे. सारासार विचार करता सध्याची झेरॉक्स दर प्रति कॉपी 3 रुपये व्हायला पाहिजे, असे मत अमोल कानडे, सचिन व्हनशेट्टी, संजय सूर्यवंशी, वासीम कमते, आलोक देवडकर, मिलिंद रेपे यांनी व्यक्त केले. पण ग्राहकांना शक्य होईल तेवढ्या कमी किमतीमध्ये झेरॉक्स काढून देण्याचा प्रयत्न सर्व झेरॉक्स दुकानदार करत आहेत. तरी सर्व ग्राहकांनी सुद्धा झेरॉक्स दुकानदारांना झेरॉक्सचे योग्य दर देऊन सहकार्य करावे, असे निवेदन निपाणी झेरॉक्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आले आहे.
—————————————————————————–
जादा प्रतिंना मिळणार सवलत
गेल्या काही वर्षात महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी नोट्स व काही पुस्तकाच्या प्रतीही झेरॉक्स करून वापरतात. अशा विद्यार्थ्यांना झेरॉक्स असो.तर्फे सवलतीच्या दरात झेरॉक्स दिले जाणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta