युवा नेते उत्तम पाटील : चौथा बॉयलर प्रदीपन समारंभ
निपाणी : सहकाररत्न रावसाहेब पाटील यांचे मार्गदर्शन व अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच या परिसरातील नेते, शेतकरी, कर्मचारी यांच्या सहकार्याने अरिहंत उद्योगसमूहाच्या आर्यन शुगरची यशस्वी वाटचाल होत आहे. यंदाच्या गळीत हंगामात साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून लवकरच इथेनॉल व मद्यार्क निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची माहिती युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली.
जैनापुर (ता. चिकोडी) येथे बोरगाव येथील अरिंहत उद्योगसमूहाच्या अरिहंत शुगर्सच्या चौथ्या बॉयलर प्रदीपन समारंभात ते बोलत होते. माजी मंत्री, आमदार रमेश जारकीहोळी व माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ पार पडला.
पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले, डोंगराळ भागात कारखाना चालवणे म्हणजे अत्यंत जिकिरीचे काम. कारखाना व्यवस्थित चालेल यावर कोणाचाही काडीमात्र विश्वास नव्हता. गळीत हंगामाच्या अंतिम टप्प्यात सन 2018-19 सालात पहिल्यांदा कारखान्याचा गळीत हंगाम सुरू केला. पहिल्याच वर्षी एक लाख 57 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले. त्यानंतर सन 2019-20 सालात दोन लाख 13 हजार तर 2020-21 सालात 3 लाख 30 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे.
दरवर्षी गाळप क्षमतेमध्ये लाखाने वाढ होत असून शेतकरी व या परिसरातील नागरिकांच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. एफआरपी दरापेक्षाही प्रत्यक्षात कारखान्याकडून गाळप करण्यात आलेल्या ऊसाला अधिकाधिक दर देण्यात येत आहे. पूरपट्ट्यातील ऊसाचे यंदा महापूरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने ऊसाची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. तरीही आपल्याला हुक्केरी, रायबाग, चिकोडी, संकेश्वर, निपाणी भागातील पुरेसा ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली होती. याची दखल घेत भविष्यात नागरिकांच्या जीविताला धोका संभवू नये यासाठी अरिहंत शुगर येथे ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तसेच शेतकर्यांना यंदापासून ऊस लागवडीसाठी खते व इतर मदत पुरविण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
यंदाही इतर कारखान्यापेक्षा ऊसाला वाढीव दर देण्यात येणार आहे. तसेच गाळप करण्यात आलेल्या ऊसाचे बिल 15 दिवसाच्या आत शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे. शेतकर्यांनी आपल्यावर ठेवलेला दृढ विश्वास कायम टिकविण्यासाठी सतत कटिबद्ध आहोत. पुढील काळात बेळगाव येथे अरिहंत उद्योग समूह व डॉ. दीक्षित यांच्यासह भागित्वाखाली मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा विचार सुरू आहे. अरिहंत परिवारातील कर्मचारी व सभासदांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा देण्याचा हा उपक्रम असणार आहे. अरिहंत उद्योग समूहाकडून शिवसागर शुगर फॅक्टरी हे दुसरे युनिट यंदाच्या गळीत हंगामात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. हस्तांतरास विलंब झाल्याने व यंत्रोपकरणांची दुरुस्ती असल्याने थोडा वेळ लागणार असून यंदाच्या गळीत हंगामात चाचणी यशस्वी करण्यात येणार असल्याचे उत्तम पाटील यांनी सांगितले.
माजी आमदार काकासाहेब पाटील व माजी आमदार सुभाष जोशी यांनी मनोगत व्यक्त करून तोरणहळ्ळीच्या हनुमंताच्या कृपेने व ब्रह्मदेवाच्या कृपाशीर्वादाने जैनापुर येथील अरिहंत कारखाना गेल्या तीन वर्षे यशस्वीरित्या हंगाम यशस्वी केले आहे. यावर्षी हा हंगामा यशस्वी होणार असल्यास आपला दृढ विश्वास असून शेतकरी व अरिहंत उद्योग समूहाचे कार्यकर्ते कारखान्यावर ठेवलेल्या विश्वासामुळेच हे शक्य होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास माजी मंत्री आमदार रमेश जरकीहोळी, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, कारखान्याचे चेअरमन अभिनंदन पाटील, संचालिका मीनाक्षी पाटील, विनयश्री पाटील, धनश्री पाटील, राजीव चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पोवार, अमोल नाईक, सतीश पाटील, निपाणीचे माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, माजी सभापती सुनील पाटील, नगरसेवक संजय सांगावकर, कुर्लीचे अरुण निकाडे , जत्राटचे ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे, सुरेश खोत, निरंजन पाटील, अनिल संकपाळ, रामा माने, रवी माळी, चेतन स्वामी, शिरीश कमते, यांच्यासह निपाणी, रायबाग, कागवाड, चिकोडी तालुक्यातील मान्यवर ऊस उत्पादक शेतकरी कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.
कारखान्याचे सी.ई.ओ. आर. के. शेट्टी यांनी आभार मानले.
