
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत, सुदैवाने जीवितहानी टळली
कोगनोळी : केरळहून मुंबईकडे आल्ले घेऊन जाणारा मालवाहू ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे पलटी झाला. यामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
अपघात रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील आप्पाचीवाडी फाट्याजवळ घडला.
याबाबत घटनास्थळावरुन व पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, महामार्गावरील आप्पाचीवाडी बोगद्यापासून उताऱ्याच्या दिशेने आल्यांची पोती भरुन मालवाहू ट्रक कागलकडे चालला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक पलटी झाला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेली आल्याची पोती रस्त्यावर विखरुन पडली होती. त्यामुळे बराच वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीसांनी भेट देऊन पाहणी केली. जयहिंद रोड डेव्हलपर्सच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. महामार्गावर कोंडी झाल्याचे पाहून पोलीसांनी अन्य मार्गाने व सर्व्हिस रोडवरुन वाहतूक सुरु केली. पलटी झालेल्या ट्रकमधील माल दुसऱ्या ट्रकमध्ये भरुन पुढे पाठविण्यात आला.
यावेळी हायवे पेट्रोलिंगचे प्रकाश बामणे, पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार पाटील, शिवप्रसाद आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta